एक गैरसमज अन् काका-पुतण्याच्या कुटुंबांत तुंबळ हाणामारी, कल्याणमध्ये भर दिवसा थरार, CCTV व्हिडीओ समोर

कल्याण पश्चिममधील धाकटे शहाड कोळीवाड्यात वडिलोपार्जित जमिनीच्या जुन्या वादातून काका-पुतण्याच्या कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या गंभीर घटनेत चार जण जखमी झाले, ज्यात पुतण्या विनोद कोट लोखंडी हत्याराने गंभीर जखमी झाला.

कल्याण पश्चिममधील धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात वडिलोपार्जित जमिनीच्या जुन्या वादातून सख्ख्या काका-पुतण्याच्या दोन कुटुंबांमध्ये शनिवारी संध्याकाळी तुंबळ हाणामारी झाली. तसेच दगडफेक झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली. कल्याण पश्चिमेकडील धाकटे शहाड कोळीवाडा परिसरात ही घटना घडली. यामुळे नागरिक हादरले आहेत. या घटनेत एकूण चार जण जखमी झाले आहेत. यावेळी पुतण्या विनोद दत्तात्रेय कोट याच्यावर लोखंडी हत्याराने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.

गैरसमजातून वादाची ठिणगी आणि हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कोट आणि त्यांचे काका विष्णू कोट यांच्यात दीर्घकाळापासून जमिनीवरून वाद सुरू आहे. शनिवारी सायंकाळी वाद विकोपाला गेला. विनोदचे वडील दत्तात्रेय कोट हे घराच्या टेरेसवर साफसफाई करत असताना, काका विष्णू कोट यांना टेरेसवर पाण्याची टाकी बसवली जात असल्याचा गैरसमज झाला. या क्षुल्लक गैरसमजातूनच शाब्दिक वाद सुरू झाला. यानंतर काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

हा वाद वाढताच काका विष्णू कोट, काकू लीलाबाई कोट आणि त्यांचा मुलगा कुणाल कोट यांनी मिळून विनोद आणि त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पुतण्या विनोद कोट याच्यावर काका विष्णू कोट यांनी थेट लोखंडी टोकदार हत्याराने डोक्यावर आणि डोळ्याजवळ घातक वार केले. यानंतर दोन्ही कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली आणि प्रचंड दगडफेक करण्यात आली.

थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

या परिसरात सुरू असलेल्या हाणामारीचा संपूर्ण थरार स्थानिक CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फुटेजमध्ये काकांकडून पुतण्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. या घटनेत विनोद कोट गंभीर जखमी झाला असून, त्याचे आई-वडील आणि दुसऱ्या बाजूचे सदस्य असे एकूण तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान जमिनीच्या वादातून सख्ख्या नात्यात झालेल्या या घटनेने कल्याण शहाड हादरले आहे. या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी तात्काळ दखल घेत दोन्ही कुटुंबांविरोधात परस्पर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. तसेच सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे वडिलोपार्जित जमिनीच्या वादाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.