Vivekanand Patil : हे खपवून घेतलं जाणार नाही, विवेकानंद पाटील यांचा वृक्षतोडीला कडाडून विरोध

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरंट पॉवर प्रकल्पासाठी ३२ हजार झाडे तोडण्याच्या निर्णयावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची टीका विरोधक करत आहेत. विवेकानंद पाटील यांनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला असून, सह्याद्रीच्या नैसर्गिक वारशाचे रक्षण करण्याची मागणी केली आहे.

Vivekanand Patil : हे खपवून घेतलं जाणार नाही,  विवेकानंद पाटील यांचा वृक्षतोडीला कडाडून विरोध
| Updated on: Oct 26, 2026 | 5:36 PM

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी तब्बल 32 हजार झाडांची कत्तल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रस्तावित वृक्षतोडीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. आता एमपीएससी आंदोलनातून चर्चेत आलेले विवेकानंद पाटील यांनीही या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे.

कर्जत आणि भीमाशंकर परिसरातील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले असून, या प्रकरणी आंदोलन करण्याची तयारीही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना विरोधकांच्या भूमिकेला ‘फेक नरेटिव्ह’ असे म्हटलं. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी संबंधित परिसराला भेट देऊन वृक्षतोडीची पाहणी केली. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. आता विवेकानंद पाटील यांनीही याप्रकरणात उडी घेत वृक्षतोडीला विरोध दर्शवला.

Loading...

काय म्हणाले विवेकानंद पाटील ?

कर्जत-भीमाशंकर पट्ट्यातील प्रस्तावित वृक्षतोडीवर भूमिका मांडताना विवेकानंद पाटील यांनी पर्यावरणाच्या होणाऱ्या संभाव्य हानीकडे लक्ष वेधलं. मोठ्या वृक्षांच्या जागी लहान रोपांची लागवड करून पर्यावरणाचे झालेले नुकसान भरून काढता येणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, एखाद्या प्रकल्पासाठी तब्बल 32 हजार 490 झाडं तोडली जाणार असतील आणि त्याऐवजी एक ते दीड किलो वजनाची लहान रोपे लावली जाणार असतील, तर त्यामुळे होणारी पर्यावरणीय हानी भरून काढणे शक्य होणार नाही.

ही केवळ एखाद्या व्यक्तीच्या आंदोलनाची बाब नसून, संपूर्ण समाजाशी संबंधित विषय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील एक जागरूक नागरिक म्हणून या वृक्षतोडीला शेवटपर्यंत विरोध करत राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

सह्याद्रीच्या पर्यावरणीय वारशावर आघात सहन करणार नाही

सह्याद्री हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा नैसर्गिक आणि पर्यावरणीय वारसा असल्याचे सांगत विवेकानंद पाटील यांनी या परिसराच्या संरक्षणाची गरज अधोरेखित केली. हजारो झाडांची तोड झाल्यास त्याचा निसर्गावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. सह्याद्रीच्या या भागातील पर्यावरणीय संपत्तीचे नुकसान होऊ नये, यासाठी या प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे सरकारकडून विरोधकांचे आरोप फेटाळले जात असताना, दुसरीकडे पर्यावरणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक होत आहेत. त्यामुळे वृक्षतोडीचा हा मुद्दा आगामी काळात आणखी चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us