केडीएमसीची मोठी कारवाई, बिल्डरांचे धाबे दणाणले; नवीन नियमावली जाहीर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने प्रदूषणाविरोधात कठोर पावले उचलत ३ बिल्डरांना दीड कोटींचा दंड ठोठावला आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेने जारी केलेले नवे नियम आता कंत्राटदारांना पाळावेच लागणार आहेत.

केडीएमसीची मोठी कारवाई, बिल्डरांचे धाबे दणाणले; नवीन नियमावली जाहीर
kdmc building
| Updated on: Feb 06, 2026 | 10:59 AM

कल्याण-डोंबिवली शहरात वाढत्या धुळीचे साम्राज्य आणि खालावलेली हवेची गुणवत्ता यावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बांधकामाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणाचे नियम न पाळणाऱ्या बिल्डर्स, मेट्रो आणि MMRDA च्या कंत्राटदारांना महापालिकेने कडक नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाचे निर्देश आणि पालिकेची कारवाई

हवेतील वाढत्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरित दखल घेत राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने नुकतीच MCHI (बिल्डर संघटना) आणि इतर मोठ्या प्रकल्पांच्या कंत्राटदारांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक संतोष डोईफोडे, पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्या रोहिणी लोकरे आणि उपायुक्त रामदास कोकरे यांनी कंत्राटदारांना फैलावर घेतले.

कंत्राटदारांसाठी नवीन डेडलाईन आणि नियम

कल्याण डोंबिवली शहरात सुरू असलेली मेट्रोची कामे, रस्ते विकास आणि खाजगी बांधकाम साईट्स यामुळे धुळीचे लोट हवेत पसरत आहेत. हे रोखण्यासाठी पालिकेने खालील नियम बंधनकारक केले आहेत.

  • उंच बॅरिकेडिंग: प्रत्येक बांधकाम साईटवर किमान २५ फूट उंचीचे पत्रे बसवणे अनिवार्य आहे. जर प्रकल्प १ एकरपेक्षा मोठा असेल, तर ही मर्यादा ३५ फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • ग्रीन नेट व ताडपत्री: बांधकाम सुरू असताना सर्व बाजूने ग्रीन नेट आणि ताडपत्रीचा वापर करून परिसर पूर्णपणे बंदिस्त करावा लागेल.
  • पाण्याचे फवारे: हवेत धूळ उडू नये म्हणून दिवसातून ठराविक अंतराने पाण्याचे फवारे मारणे (Water Sprinkling) सक्तीचे करण्यात आले आहे.

3 बिल्डरांना बसला दीड कोटींचा फटका

कल्याण डोंबिवली महापालिकेने केवळ इशारा देऊन न थांबता कारवाईला सुरुवातही केली आहे. यापूर्वीच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन मोठ्या बिल्डरांवर प्रत्येकी ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात हा दंड ५ कोटी रुपयांपर्यंत असल्याने, कल्याण-डोंबिवलीतही आगामी काळात दंडाची रक्कम वाढवण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत.

पालिकेची यंत्रणा सज्ज

शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सुधारण्यासाठी पालिकेने स्वतःहून काही उपाययोजना राबवल्या आहेत.

१. विशेष पथके: १० प्रभागांसाठी १० विशेष देखरेख पथके तैनात.

२. अत्याधुनिक यंत्रणा: १० धूळ शोषक यंत्रे (Dust Suction Machines) आणि ६ धूळ शमन यंत्रे (Anti-Smog Guns) सध्या शहरात कार्यरत आहेत.

३. AQI मध्ये सुधारणा: १ आणि २ फेब्रुवारीला शहराचा AQI १२६ होता, जो महापालिकेच्या कारवाईनंतर ३ फेब्रुवारीला ९५ आणि ४ फेब्रुवारीला ९९ पर्यंत खाली आला आहे.