आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर अन् औषध डम्पिंग ग्राऊंडवर, कल्याणमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

कल्याण-डोंबिवली महापालिकेने (केडीएमसी) लाखो रुपयांची औषधे कचरा प्रकल्पात टाकली, यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. "फॅबिफ्लू" आणि "अ‍ॅमॉक्सक्लाव्ह" सारखी औषधे उंबर्डे येथील कचरा प्रकल्पात सापडली.

आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर अन् औषध डम्पिंग ग्राऊंडवर, कल्याणमध्ये नेमकं चाललंय तरी काय?
kalyan dombivali
| Updated on: Jul 18, 2025 | 7:52 AM

सुनील जाधव, कल्याण: कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर केडीएमसीची लाखो रुपयांची औषधे नष्ट करण्यासाठी आणण्यात आल्याने आरोग्य विभागाचा गलथान कारभार उघड झाला आहे. एकीकडे केडीएमसीची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असताना, लाखो रुपयांचा औषधांचा साठा अशा प्रकारे नष्ट करण्यासाठी डम्पिंग ग्राउंडवर आढळल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा साठा डम्पिंग ग्राउंडवर कसा आला आणि कोणी आणला, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. हा चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. कधी डॉक्टरांचा हलगर्जीपणा, तर कधी रुग्णवाहिका चालकांची मनमानी, अशा एक ना अनेक कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेची रुग्णालये नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. आता केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महापालिका रुग्णालयाला शासनाकडून कल्याण डोंबिवली महापालिकेला लाखो रुपयांची औषधे पाठवली जातात. तसेच करदात्या नागरिकांचे लाखो रुपये खर्च करुन ही औषधे कल्याण डोंबिवली महापालिका स्वतः विकत घेत असते.

मात्र, कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे येथील कचरा प्रकल्पामध्ये, जिथे वैद्यकीय कचरा नष्ट केला जातो, तेथे केडीएमसीच्या लाखो रुपयांच्या औषधांचा साठा आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कचरा प्रकल्पामध्ये “Tab Fabiflu 200mg” (एक्सपायरी डेट 04/2023) या औषधाच्या 409456 गोळ्या, तसेच “Syp Ammoxclav Oral Suspension” (एक्सपायरी डेट 08/2025) या सिरपच्या 450 बाटल्या आढळल्या आहेत. विशेष म्हणजे Ammoxclav सिरपची मुदत अजून संपलेली नसून ते वापरण्यास योग्य होते. गरिबांसाठी आणि गरजू रुग्णांसाठी आलेली ही औषधे कचऱ्यात कशी आली, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

चौकशी सुरू

या घटनेमुळे केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. नागरिकांनी याबाबत केडीएमसीला माहिती दिली असता, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले. ही औषधे कचरा प्रकल्पात कुठून आली, ती कोणी आणली, याची चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

कठोर कारवाई करण्यात येणार

मात्र, यापूर्वीही अशाच प्रकारे दोन ट्रक भरून औषधे नष्ट करण्यात आल्याची माहिती नागरिकांकडून दिली जात आहे. गरीब नागरिकांसाठी आणलेली औषधे त्यांना न देता अशा प्रकारे नष्ट करत असल्याच्या या घटनेमुळे केडीएमसीचा आरोग्य विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. औषधे नष्ट करण्यासाठी आयुक्तांच्या परवानगी पत्राची आवश्यकता असते. मात्र ते न घेताच ही औषधे डम्पिंग ग्राउंडवर आणल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.