पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचलं, हाय कोर्टाकडून गंभीर दखल, बीएमसीला नोटीस

मुंबईमधील केईएम सारखं गजबजलेलं रुग्णालयही पावसाच्या तडाख्यातून वाचू शकलं नाही, पहिल्याच पावसात रुग्णालयात पाण्याचं तळं साचल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणाची गंभीर दखल आता मुंबई हाय कोर्टाकडून घेण्यात आली आहे.

पहिल्याच पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचलं, हाय कोर्टाकडून गंभीर दखल, बीएमसीला नोटीस
Image Credit source: PTI
| Updated on: May 29, 2025 | 9:03 PM

मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला, या पावसाचा मोठा फटका हा मुंबईकरांना बसला, पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक कोलमडल्याचं पाहायला मिळालं, तसेच अनेक सखल भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्यानं याचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवर देखील झाला. विशेष म्हणजे या पावसाचा फटका हा केईएम सारख्या बड्या रुग्णालयालाही बसला, पावसामुळे रुग्णालय परिसरात पाण्याचं तळ साचल्याचं पाहायला मिळालं, आता या प्रकरणाची गंभीर दखल मुंबई हाय कोर्टाकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयानं मुंबई महापालिकेला नोटीस जारी केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?  

मुंबईमधील केईएम सारखं गजबजलेलं रुग्णालयही पावसाच्या तडाख्यातून वाचू शकलं नाही, पहिल्याच पावसात रुग्णालयात पाण्याचं तळं साचल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणाची गंभीर दखल आता मुंबई हाय कोर्टाकडून घेण्यात आली आहे. सुमोटो याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हाय कोर्टाकडून मुंबई महापालिकेला नोटीस पाठवण्यात आली आहे.

पहिल्याच पावसामध्ये मुंबईमधील केईमए सारख्या 24 तास गजबलेल्या महपालिका रुग्णालयात तळं साचल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे चांगलेच हाल झाले. या प्रकरणाची मुंबई हाय कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे.  मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील हे चित्र फारच विदारक आणि चिंतेत टाकणारं असल्याचं वकील मोहीत खन्ना यांनी गुरुवारी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिलं.

हाय कोर्टात शासकीय रुग्णालयांमधील दुरावस्थेबाबत दाखल सुमोटो याचिकेवर न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली. यावेळी पालिका प्रशानाशी बोलून तातडीनं काय उपाय करता येतील? याची माहिती सादर करण्याचे निर्देश हाय कोर्टाकडून सरकारी वकिलांना देण्यात आले होते. त्यानुसार सहाय्यक डीन हे आज सायंकाळी उशिरा हाय कोर्टात हजर झाले.

हायकोर्टानं पालिकेला याबाबत तातडीनं उपाययोजना करत अशी घटना पुन्हा होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश जारी केले आहेत. तसेच मुंबई महपालिकेलाही यात प्रतिवादी करण्याचे निर्देश जारी करत, केलेल्या उपाययोजना प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.