Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्या प्रकरणी मोठी कारवाई, आणखी एकाला अटक; तिसरा आरोपी कोण ?
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या वर्गमित्राला हत्येच्या कटाची माहिती असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी झालेल्या या हत्येप्रकरणी रितेशला 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल (Ketan Agwarwal ) हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना पोलिसांनी आधीच अटक केली होती, दोघेही सध्या तुरूंगात आहेत. आता याप्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रितेश हिंगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती आहे.
लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती..
रितेशला आधीच होती कटाची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेशला केतनच्या हत्येच्या कटाची आधीपासून माहिती होती, असा संशय आहे. चेतन चौधरी आणि रितेश हिंगे यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषणाच्या आधारे त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे संभाषण रितेशने डिलीट केलं होतं. मात्र, पोलिसांनी ते रिकव्हर केल्यानंतर तपासात महत्त्वाची माहिती मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
त्यालाही लोहगडावर यायला सांगितलं पण…
आरोपी चेतन चौधरी याने त्याच्या मित्राला हत्येच्या कटाची माहिती दिली होती, असा पोलिसांना संशय आहे. एवढंच नव्हे तर 18 जून रोजी , ज्या दिवशी केतनचा मृत्यू झाला, त्याच दिवशी सिया आणि चेतन यांनी त्यांच्या मित्राला, रितेशला लोहगडावर सोबत येण्यास सांगितलं होतं. मात्र त्याने त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. हत्येनंतरही चेतन आणि सिया यांचा रितेशशी संपर्क असल्याचं तपासात समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश हिंगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून, सध्या तो बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करतोय. न्यायालयाने रितेशला 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण ?
पुण्यातील नामांकित व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र, तपासादरम्यान केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी कट रचून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं.
घटनेनंतर आरोपींनी केतनचा घसरून अपघाती मृत्यू झाल्याचं भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांची पडताळणी करत कसून चौकशी केली. त्यातून या घटनेमागचं धक्कादायक सत्य हळूहळू समोर आलं. केतनचा मृत्यू अपघात नसून, पूर्वनियोजित कटातून करण्यात आलेली हत्या असल्याचं तपासात निष्पन्न झालं.
केतन आणि सिया गोयल यांचा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यास ते एकमेकांसोबत आनंदी आणि परफेक्ट कपल असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र, पोलिसांच्या तपासानुसार, पडद्यामागे वेगळीच कहाणी सुरू होती. सिया ही तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत केतनला संपवण्याचा कट रचत असल्याचं तपासातून समोर आलं. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा मृत्यू होण्याच्या अवघ्या चार दिवस आधीही सियाने त्याला किल्ल्यावरून खाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं. मात्र, त्यावेळी तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर 18 जून रोजी पुन्हा केतनला किल्ल्यावरील उंच ठिकाणी नेऊन खाली ढकलण्यात आलं, असा आरोप आहे.