इचलकरंजीतील मंदार रानडे प्रकरणाचा उलगडा! दुसऱ्या लग्नाचं आमिष दाखवून बोलावलं अन्…; थरारक घटनाक्रम समोर

Mandar Ranade Case: इचलकरंजीतील ज्योतिषी मंदार रानडे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मुलीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून निर्घृण खून करण्यात आला आहे.

इचलकरंजीतील मंदार रानडे प्रकरणाचा उलगडा! दुसऱ्या लग्नाचं आमिष दाखवून बोलावलं अन्...; थरारक घटनाक्रम समोर
| Updated on: Nov 04, 2026 | 7:16 PM

कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये एक भयंकर कृत्य घडलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपलीकडील एका उसाच्या शेतात शनिवारी इचलकरंजी येथील ३५ वर्षीय पुजारी मंदार रानडे मृतावस्थेत आढळून आले होते. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू होता. अखेर आता इचलकरंजीतील ज्योतिषी मंदार रानडे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मंदार रानडे यांचा मृतदेह इचलकरंजीपासून सुमारे 7 किमी अंतरावर कर्नाटकातील सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकापूर गावात सापडला. ही हत्या शनिवारी पहाटेच्या सुमारास झाली आहे. हल्लेखोराने सर्वप्रथम गावाजवळील रस्त्यावर रानडे यांना अडवले. हल्ला करण्यापूर्वी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी भयानक कारण समोर आले आहे.

Loading...

इचलकरंजीतील ज्योतिषी मंदार रानडे यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह जुळवून दिल्याचा राग मनात धरून आरोपीने मंदार रानडे यांचा काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आणखी एक लग्न जुळवायचे असल्याचे आमिष दाखवून आरोपीने मंदार यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मानकापूर परिसरात बोलावले.

त्यानंतर त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून धारदार विळ्याने गळ्यावर वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील सदलगा पोलिसांनी बाबासो उर्फ दीपक अण्णा मगदूम याला महाराष्ट्रातून ताब्यात घेतले आहे. तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या चौकशीतून या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. तसेच आज आरोपीला इचलकरंजी शहरांमध्ये शिरद वाडा या ठिकाणी तपासणीसाठी फिरवण्यात आले आहे.

मंदार रानडे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह इचलकरंजी येथे राहत होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. या प्रकरणात बेळगाव जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बाबासो उर्फ दीपक मगदूम पोलिसांच्या ताब्यात आहे. तांत्रिक तपासातून आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच या हत्येतील शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us