हॉटेल्स फुल्ल, रस्ते जाम…; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांची या ठिकाणाला पसंती, कारण…

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झाले असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिसॉर्ट्स ९०% आरक्षित झाली आहेत. पर्यटकांच्या विक्रमी गर्दीमुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळत आहे.

हॉटेल्स फुल्ल, रस्ते जाम...; नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांची या ठिकाणाला पसंती, कारण...
konkan
| Updated on: Dec 23, 2025 | 11:05 AM

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने सध्या संपूर्ण कोकण किनारपट्टी पर्यटकांनी गजबजून गेली आहे. नाताळपासून सुरू झालेला पर्यटकांचा ओघ नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे. यंदा कोकण पर्यटनाने गेल्या अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण किनारपट्टीवर पर्यटकांचा महापूर ओसंडून वाहताना दिसत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील प्रमुख पर्यटन स्थळांवरील रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि होमस्टे आतापासूनच ८० ते ९० टक्के आरक्षित झाले आहेत.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील प्रमुख पर्यटन स्थळांवर सध्या ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड पाहायला मिळत आहेत. पर्यटन व्यावसायिकांच्या माहितीनुसार, ८० ते ९० टक्के रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आधीच आरक्षित झाली आहेत. विशेषतः मध्यमवर्गीय पर्यटकांनी हॉटेलपेक्षा स्थानिक होमस्टेला अधिक पसंती दिली आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे. वाढत्या मागणीमुळे काही ठिकाणी निवासाचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत.

तरुणाईची मोठी गर्दी

सिंधुदुर्गातील मालवण आणि तारकर्ली येथे स्कूबा डायव्हिंगसाठी तरुणाईची मोठी गर्दी होत आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर आणि समुद्रकिनाऱ्यावर भाविक व पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. रायगडमधील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि दिवेआगर यांसारख्या मुंबईजवळच्या ठिकाणी पर्यटकांचा सर्वाधिक राबता आहे. केवळ निसर्गसौंदर्यच नाही, तर कोकणातील अस्सल मालवणी जेवण, ताजी मासळी आणि सोलकढीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

यंदाच्या हंगामात सुमारे ८ ते १० लाख पर्यटक कोकणात येतील असा अंदाज आहे. यामुळे स्थानिक वाहतूकदार, रिक्षाचालक, मच्छीमार आणि हस्तकला विक्रेत्यांच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. काजू, कोकम सरबत आणि कोकणी मेव्याची विक्री दुप्पट झाली आहे. या १० दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचे संकेत आहेत. पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता किनारपट्टीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लाइफगार्ड्सना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पर्यटन उद्योगासाठी हे वर्ष सुगीचे

तसेचवाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रमुख महामार्गांवर अतिरिक्त यंत्रणा राबवली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे प्रवाशांना काही अडचणी येत असल्या तरी रेल्वे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून पर्यटक कोकण गाठत आहेत. यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकण पूर्णपणे सज्ज झाले असून पर्यटन उद्योगासाठी हे वर्ष सुगीचे ठरणार आहे.