भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!

Kunal Chandgude : कुणाल चांदगुडेच्या आठवणींनी त्याची मावस बहीण अक्षरा भावूक झाली आहे. अक्षराने जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात तिने महत्त्वाची माहिती दिली आहे.

भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
Kunal Chandgude Sister
Image Credit source: Google
| Updated on: Aug 26, 2026 | 11:56 PM

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी : खवड्या डोंगर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुणाल चांदगुडेच्या आठवणींनी त्याची मावस बहीण अक्षरा भावूक झाली आहे. कुणालसोबत एका लग्नाच्या कार्यक्रमात नृत्य करतानाचा जुना व्हिडिओ अक्षराने सोशल मीडियावर शेअर केला असून, या पोस्टमधून तिने कुणालच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘नाही विसरू शकत रे तुला कोणी… माफ कर आम्हाला, तुला वाचवू शकलो नाही’ अशा शब्दांत अक्षराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अक्षराने कुणालसह त्याची आणि आणि तिची मावशी संगीता चांदगुडे आणि कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे यांच्याबाबत सोशल मीडियावर होत असलेल्या आरोपांवरही अक्षराने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुणाल तसला मुलगा नव्हता. त्याच्यावर करण्यात येणारे आरोप खोटे आणि घाणेरडे आहेत, असा दावा अक्षराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून केला आहे.

आयफोन किंवा पैशांसाठी त्याने हे केलं नाही

अक्षराने म्हटले की, कुणालच्या आई-वडिलांनी लहानपणापासून त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे आयफोन किंवा पैशांसाठी त्याने हे सगळं केलं, अशी चर्चा चुकीची आहे. कुणालकडे स्वतःचा आयफोन 15 प्रो होता आणि त्याला पैशांची कधीच गरज नव्हती असा दावा तिने केला आहे. तसेच शेतीच्या वाटणीचा विषय आणि कुणालच्या वडिलांचा मुद्दा वेगळा असल्याचं अक्षराने म्हटलं आहे. कुणालला केवळ त्याचे वडील पुन्हा आपल्या जवळ हवे होते. मात्र, त्याच्या मनात त्याच्या आत्याने वडिलांना आपल्यापासून दूर केल्याची भावना होती, असा दावा अक्षराने केला आहे.

वीस वर्षांत जवळ केलं नाही, मग अचानक का?

अक्षराच्या म्हणण्यानुसार, गेल्या 20 वर्षांत ज्यांनी कुणालला जवळ केलं नाही, त्याच्याशी बोलले नाही, त्यांनी अचानक जवळ येण्याचा प्रयत्न का केला? हा प्रश्न कुणाल आणि त्याची मावशी संगीता यांना खटकत होता. वडिलांबाबतचा मुद्दा कुणालसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, असा दावाही अक्षराने केला आहे.

कुणालच्या वडिलांबाबत बोलताना अक्षराने म्हटले की, मुरलीधर काकांचा स्वभाव अत्यंत निर्मळ होता. कोणी त्यांच्याशी चांगलं आणि गोड बोललं तर ते त्या व्यक्तीसाठी जीवही द्यायला तयार व्हायचे. दरम्यान, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अक्षराने कुणालसोबतच्या आठवणींचा जुना व्हिडिओ शेअर करत त्याच्यावर खोटे आरोप करू नयेत, अशी भावनिक विनंती केली आहे.

 

 

Follow Us