
वर्षभरापूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’बराच गाजावाजा झाला असून सरकारला त्याचा मोठा फायदा मिळाला. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा सुमारे वर्,भर कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला असून त्याचा विधानसभा निवडणुकीत महायुतीलाही बंपर फायदा झाला. मात्र याच लाडकी बहीण योजनेत अनेक घोटाळा, गैरप्रकार झाल्याच्या बातम्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत. काही ठिकाणी पुरूषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले तर काही ठिकाणी शासकीय कर्मचारी महिलांनाही या योजनेच्या पैशांचा मोह झाल्याने त्यांनीही या पैशांवर डल्ला मारल्याचे उघड झाले.
या योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारकडून पडताळणी केली जात असून आता जालना जिल्ह्यात 70 हजार लाडक्या बहिणींची देखील पडताळशणी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्याअंतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत जिल्हाभरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.
एकाच घरातील दोन पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याच्या संशयामुळे होणार पडताळणी
जालना जिल्ह्यात एकाच कुटुंबातील अनेक युक्त्या आणि शक्कल लढवून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आल्याने आता या लाभार्थी महिलांचा योजनेतून पत्ता कट होणार आहे. या महिलांची नावे योजनेतून काढून टाकण्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. शासनाकडून जालना जिल्ह्यातील जवळपास 70 हजार लाभार्थी महिलांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली असून याच आधारे घरोघरी जाऊन ही पडताळणी केली जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने ही योजना सुरू केली त्यावेळी फारसे निकष न तपास अर्ज मंजूर केले मात्र या योजनेचा आर्थिक भार आता सरकारवर पडत असल्याने छाननी प्रक्रिया ठिकठिकाणी सुरू आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत 4 लाख 64 हजार लाभार्थ्यांचा समावेश असून यापैकी 70 हजार लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे.
अर्ज छाननीचा रत्नागिरी जिल्ह्यातील 50 हजारांहून अधिक बहिणींना फटका
अर्ज छाननीचा रत्नागिरी जिल्ह्यातील 50 हजार 700 लाडक्या बहिणींना फटका बसला आहे. अर्ज बाद झाल्याने महिलांच्या खात्यात जूनच्या हप्त्याचे पैसे अद्याप आलेले नाहीत.
लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यातून 4 लाख 24 हजार महिलांनी अर्ज केला होता. यामध्ये 65 वर्षांपेक्षा अधिक असलेल्या महिलांचे 4 हजाराहून अधिक अर्ज बाद झाले तर 20 वर्षाखालील मुलींनी देखील लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केल्याचे यात उघड झाले.
यापूर्वीही झाले अनेक गैरप्रकार
दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेत अनेक घोटाळे झाल्याचे आत्तापर्यंत उघड झाले असून 14 हजारांपेक्षा जास्तच पुरूषांनी या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लाटले, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. 10 महिन्यांपर्यंत लाडक्या पुरूषांनी दरमहा 1500 रुपये लाटले असून वाटप करण्यात आलेल्या या रकमेचा आकडा 21 कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती उघड झाली. तर त्यापूर्वी शासकीय कर्मचारी महिलांनी देखील या योजनेच्या पैशांवर डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. . राज्यातील तब्बल 1 लाख 60 हजांरापेक्षा अधिक (महिला-पुरूष) कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असता हे धक्कादायक सत्य उघड झालं. तब्बल 2 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत त्याचे पैसे लाटल्याचे उघड झाले होते. त्यामुळे आता शासनाकडून जोमाने पडताळणी सुरू आहे.