Beed News: आधी कुत्र्याच्या पिल्लाची शिकार, नंतर भटक्या कुत्र्यांचा पलटवार; हल्ल्यात बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू
Stray Dogs Kill Leopard Cub in Beed: बीडमध्ये भटक्या कुत्र्यांनी बिबट्याच्या पिल्लावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात कुत्र्याच्या पिल्लाची शिकार करायला आलेल्या बिबट्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

बीडमध्ये एक धक्कादायक बातमी घडली आहे. जंगलातून मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरात ही घटना घडली. भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याच्या पिल्लाने आधी कुत्र्याच्या छोट्या पिल्लावर हल्ला करून त्याला ठार केले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच भटक्या कुत्र्यांनी एकत्र येत बिबट्याच्या पिल्लावर हल्ला चढवला. यानंतर थरारक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात असलेल्या थोरात वस्ती परिसरात बिबट्याचे एक पिल्लू दाखल झाले होते. भुकेने व्याकुळ झाल्यामुळे हे पिल्लू भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीजवळ आले असावे, असा अंदाज आहे. याचदरम्यान त्याची नजर एका कुत्र्याच्या छोट्या पिल्लावर पडली. बिबट्याच्या पिल्लाने या कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला चढवला. या हल्ल्यात कुत्र्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला.
मात्र कुत्र्याच्या पिल्लावर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरातील भटकी कुत्री आक्रमक झाली. अनेक कुत्र्यांनी एकत्र येत बिबट्याच्या पिल्लाला घेरले आणि त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बिबट्याच्या पिल्लाला स्वतःचा बचाव करता आला नाही. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. अखेर या जखमांमुळे बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला. यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याच्या पिल्लाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच या घटनेची नोंद घेत पुढील कार्यवाही सुरू केली. भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्त्यांमध्ये येण्याच्या घटनांमुळे वन्यजीव आणि मानवी वस्त्यांमधील संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेत एका बाजूला कुत्र्याच्या पिल्लाचा, तर दुसऱ्या बाजूला बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.