ठाकरेंनी काढलं, शिंदेंनी गोंजारलं, राजकारणात मध्यरात्री मोठा भूकंप, नेमकं काय घडलं?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेपूर्वी राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ठाकरेंनी काढलं, शिंदेंनी गोंजारलं, राजकारणात मध्यरात्री मोठा भूकंप, नेमकं काय घडलं?
uddhav thackeray eknath shinde
| Updated on: Mar 17, 2026 | 7:34 AM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात पहिल्या महासभेपूर्वीच मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाने काल शिस्तभंगाची कारवाई करत नगरसेवक मधुर म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर अवघ्या काही तासातच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. यामुळे आता केडीएमसीच्या राजकारणात ठाकरेंनी काढलं आणि शिंदेंनी गोंजारलं अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तसेच यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळही उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे ११ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे चार नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाले होते. हे चारही नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पाहायला मिळत होती. या पार्श्वभूमीवर पक्षाचे सचिव वरुण सरदेसाई यांनी मधुर म्हात्रेंसह अन्य नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काल सकाळीच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

भगवा ध्वज हाती घेतला

ठाकरे गटातून हकालपट्टीचे पत्र हाती पडल्यानंतर मधुर म्हात्रे यांनी विलंब न लावता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर मधुर म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि आमदार राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा ध्वज हाती घेतला. यावेळी मधुर म्हात्रे यांनी विसाव्या शतकातील हिंदुत्वाचा विचार आणि विकासकामांना साथ देण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे सूतोवाच केले.

तीन नगरसेवकांचे घरवापसी नाट्य

एकीकडे मधुर म्हात्रे यांनी गट बदलला असताना, दुसरीकडे बेपत्ता असलेल्या उर्वरित तीन नगरसेवकांनी (राहुल कोट, स्वप्नाली केणे आणि कीर्ती ढोणे) पुन्हा ठाकरे गटाच्या गटनेत्यांची भेट घेतली. त्यांनी आपली निष्ठा मातोश्रीशीच असल्याचे स्पष्ट केले. आम्ही काही वैयक्तिक कारणांमुळे बाहेर होतो, मात्र आमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या.” असे नगरसेवक राहुल कोट यांनी सांगितले. यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ आता १० वर स्थिरावले आहे.

मधुर म्हात्रे यांच्या प्रवेशामुळे आता कायदेशीर लढाईला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर आणि प्रतोद संकेत भोईर यांनी म्हात्रे यांना अपात्र ठरवण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. जर त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले, तर त्या प्रभागात पोटनिवडणूक लागण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

महासभेपूर्वी तणावपूर्ण वातावरण

दरम्यान आज होणाऱ्या महासभेत शिक्षण समिती आणि महिला-बालकल्याण समितीच्या महत्त्वाच्या नियुक्त्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दल (SRPF) देखील पालिकेबाहेर तैनात आहे.

Follow Us