चाळ्यांना थारा नाहीच, हॉटेल, रेस्टोरेंटमधील अश्लील नृत्यास चाप, डान्सबार सुधारणा विधेयक मंजूर

Maharashtra Dance Bar Amendment Bill : अनेकदा हॉटेल, बारमध्ये अश्लील नृत्य केले जात असल्याचे समोर आलेले आहे. मात्र आता अशा नृत्यास चाप बसणार आहे. कारण डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.

चाळ्यांना थारा नाहीच, हॉटेल, रेस्टोरेंटमधील अश्लील नृत्यास चाप, डान्सबार सुधारणा विधेयक मंजूर
maharashtra dance bar amendment bill
Image Credit source: Google
| Updated on: Jul 07, 2026 | 8:34 PM

डान्सबारचे वेड असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. अनेकदा हॉटेल, बारमध्ये अश्लील नृत्य केले जात असल्याचे समोर आलेले आहे. मात्र आता अशा नृत्यास चाप बसणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. तसेच तीनवेळा उल्लंघन केले तर परवाना रद्द करण्यात येणार आहे. या विधेयकाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी विधानसभेत हे विधेयक सादर केसे. या विधेयकानुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमधील लाइव्ह म्युझिक आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांसाठीचे परवाने महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत देण्याची तरतूद काढून टाकण्यात आले आहेत. त्याऐवजी हे परवाने महाराष्ट्र हॉटेल, रेस्टॉरंट आणि बाररूममधील अश्लील नृत्य प्रतिबंध व तेथे काम करणाऱ्या महिलांच्या सन्मानाचे संरक्षण अधिनियम, 2016 अंतर्गत दिले जाणार आहेत. त्यामुळे अश्लील नृत्याची व्याख्या विचारात घेऊन आता हे परवाने दिले जातील.

काय म्हणाले पंकज भोयर?

गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी याबाबत सभागृहात बोलताना सांगितले की, या अधिनियमात कठोर शिक्षेची तरतूद करत आहोत. तसेच तीनवेळा उल्लंघन केले तर परवाना रद्द करणार आहोत. या विधेयकामुळे हॉटेल व रेस्टॉरंट मधील अश्लील नृत्याला आळा बसेल. अश्लील नृत्य म्हणजे त्याची कायद्यात व्याख्या दिली आहे. अश्लिल नृत्याला प्रतिबंध घालत महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासाठी हे विधेयक मंजूर करण्यात यावे.

गावाखेड्यात डान्सबार पोहोचले…

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या विधेयकावर बोलताना म्हटले की, बार तर गावागावात पोहोचले आहेत, मोठ्या शहरातील डान्सबार हे तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या यंत्रणा महाराष्ट्रात वाढत आहे. कायद्यात काही तरतुदी करायला हव्या. आपण फक्त डान्सबार मालकावर कारवाई करायची तरतूद असते. मुंबई शहरात भिवंडी, ठाणे या भागात अवैध डान्सबार पाहायला मिळतात पोलिसांच्या संरक्षणाशिवाय ते चालत नाही. कायद्याचा सर्वांना वचक राहिला पाहिजे.

आमदार संजय केळकर यांनी म्हटले की, ऑर्केस्ट्रा लायसन्स सोडा, पर्यटन स्थळावर हॉल घेतले जातात, तिथे अश्लील नृत्यासोबत ड्रग्ज घेतले जाते. त्याचा अंतर्भाव केला पाहिजे तरुण तरुणींच्या बाबत किती घटना वर्षभरात झाल्या आहेत, त्याची एक कोड भाषा असते. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे चालते, त्यांवर कारवाईची तरतूद करा. त्यांच्या आशीर्वादाने हे चालले आहे अशी लोकांची समजूत होती, म्हणून ती तरतूद करावी अशी सूचना आहे.

अश्लील म्हणजे काय? हे स्पष्ट करा…

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत म्हटले की, त्याबारमध्ये काम करणारी माझी गरीब बहिण ती तिच्या पोटासाठी काम करते. ⁠तिच्या पोटाचा आपण विचार करणार की नाही. तिच्या अंगाच प्रदर्शन होणार नाही म्हणजे काय? ⁠डानसबार चालणार नाही का? ⁠यात अश्लील म्हणजे काय? हे आपण महाराष्ट्राला समजून सांगा. ⁠या सभागृहातील अनेक सदस्य तमाशा शौकीन होते ⁠त्यामुळे अश्लीलता म्हणजे काय ते स्पष्ट करावे.

 

Follow Us