कधी कृष्णाचा अवतार, तर कधी शिवाचा… महाराष्ट्रातील दोन शहरांत सर्वाधिक भोंदूबाबा अटकेत, तुमचं शहर यात आहे का?

महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गेल्या महिन्यात १४ भोंदू बाबांवर गुन्हे दाखल झाले असून मुंबई आणि नाशिकमध्ये सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. सुशिक्षित नागरिकांची फसवणूक आणि महिलांच्या शोषणाचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.

कधी कृष्णाचा अवतार, तर कधी शिवाचा... महाराष्ट्रातील दोन शहरांत सर्वाधिक भोंदूबाबा अटकेत, तुमचं शहर यात आहे का?
maharashtra superstition
| Updated on: Apr 30, 2026 | 11:31 AM

राज्यभरात गाजलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धेच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आणि सामाजिक संस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या ३० दिवसांत राज्याच्या विविध जिल्ह्यांतून भोंदू बाबांबद्दल धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. यानुसार, गेल्या महिनाभरात १४ भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शहरी भागातील सुशिक्षित नागरिकांची होणारी फसवणूक चिंतेचा विषय ठरत आहे.

नाशिक आणि मुंबईत सर्वाधिक कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या एका महिन्यात १४ भोंदू बाबांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या नोंदवण्यात आलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी सर्वाधिक गुन्हे हे मुंबईतील आहे. मुंबईतून ४ भोंदूबाबांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये ३ भोंदू बाबांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर उर्वरित गुन्हे राज्याच्या विविध जिल्ह्यांत विभागलेले आहेत. आतापर्यंत असा समज होता की भोंदूगिरी केवळ ग्रामीण भागात चालते, परंतु या ताज्या आकडेवारीवरून मुंबई आणि नाशिकसारख्या महानगरांमध्येही बुवाबाजी मोठ्या प्रमाणावर फोफावल्याचे सिद्ध झाले आहे.

अवताराच्या नावाखाली महिलांचे शोषण

या प्रकरणांमध्ये समोर आलेली गुन्ह्यांची पद्धत अत्यंत भयावह आहे. आरोपींनी स्वतःला कृष्णाचा अवतार किंवा शिवाचा अवतार सांगत महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. कौटुंबिक अडचणी, आजारपण किंवा मानसिक त्रासावर उपाय करण्याच्या बहाण्याने या महिलांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण करण्यात आले. अध्यात्माचा आधार घेऊन महिलांवर अत्याचार करणाऱ्या या भोंदू बाबांच्या टोळ्या आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

तसेच अशोक खरात प्रकरणानंतर पीडित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती झाली आहे. यामुळेच अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे प्रकार आता पोलिसांपर्यंत पोहोचत आहेत. खटला भरताना प्रामुख्याने महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा २०१३ अंतर्गत कारवाई केली जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या मोहिमेत पुढाकार घेतला आहे. भोंदूगिरी नष्ट करण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नाही, तर लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे. अंनिसच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी अशा भोंदू बाबांचा शोध सुरू असून, पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असे समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी स्पष्ट केले.

Follow Us