उष:काल होता होता काळ रात्र झाली, हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपीटमुळे हाहाकार

| Updated on: Mar 18, 2023 | 10:02 PM

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. शेतकरी उद्ध्वस्त झालेत. शेतातला गहू, हरभरा, फळांच्या बागा पाहून आनंद व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांचं एक दिवसात होत्याच नव्हतं झालंय.

उष:काल होता होता काळ रात्र झाली, हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये गारपीटमुळे हाहाकार
Follow us on

मुंबई : हाता तोंडाशी आलेला शेतातला माल विकून आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उष:काल येईल, अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबात पुन्हा संकटाची काळरात्र आलीय. शेतकऱ्यांच्या आयुष्यात समाधान आणि आनंदाचा उष:काल होईल असं वाटत असतानाच आज पुन्हा त्याच काळरात्रीच्या दिशेला शेतकरी लोटला गेलाय. हा उष:काल उजाडण्याआधीच शेतकऱ्यांच्या नशिबात नको असलेल्या संकटाची काळ रात्र आलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. इतकी मेहनत केली, संघर्ष केला, यातना सोसल्या, वेळप्रसंगी अपमान सोसले, पण तरीही शेतकऱ्यांना पुन्हा पदरी यातनाच पडल्या आहेत. महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर हे संकट कोसळलंय याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शेतातला माल हा शेतकऱ्याच्या आयुष्यातला खजिना असतो. शेतातलं पीक हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं सोनं असतं. पण हाच खजिना अवकाळी पावसाने हिरावून नेला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतातला गहू, हरभरा, फळांच्या बागा पाहून आनंद आणि समाधान व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांचं एक दिवसात होत्याच नव्हतं झालंय. संपूर्ण पीकं जमीनदोस्त झाली आहेत. शेतातला माल विकून आपण आपल्या आयुष्याला आणखी चांगल्याप्रकारे जगू. सगळं कर्ज फेडू, मुलांचं चांगल्या शाळेत शिक्षण करु, मुलीचं लग्न करु, असे अनेक विचार शेतकऱ्यांच्या मनात होते. पण सारं जागेवर राहून गेलंय.

पाच एकर शेतातला गहू अक्षरश: आडवा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सादलगावमधील एका शेतकऱ्याचा पाच एकर शेतातला गहू अक्षरश: आडवा झालाय. या गव्हाच्या उत्पन्नावर शेतकऱ्याने पुढची आर्थिक गणितं मांडली होती. मात्र अवकाळी पावसाने त्याची सर्व स्वप्न अक्षरश: धुळीस मिळवले. मायबाप सरकारने या शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे अश्रू पुसावेत, अशी मागणी केली जाते

बुलढाण्यात गारपीट, शेतकऱ्यांवर संकट

बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. या दरम्यान काही भागात रिमझिम पाऊस पडला. मात्र काल सायंकाळी आणि आज दुपारी खामगाव, मलकापूर तालुक्यात प्रचंड गारपीट झालीय.सोबतच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसही पडला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसलाय. शेतातल्या उभ्या पिकांचे नुकसान झालंय. यात गहू, हरभरासह इतर पिकांचं नुकसान झालंय. सुलतानी संकटासोबतच अस्मानी संकट सुद्धा शेतकऱ्यांवर कोसळलं. यात हाताशी आलेल्या गहू, हरबरा, मका, कांद्यासह फळबागांचे प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाया द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

यवतमाळमध्ये गारपीट

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पोफाळ कारखाना, मुळावा, अंबाळी, मरसुळ तसेच तालुक्यातील गावांना विजेच्या कडकडासह गारपीटीचा तडाखा बसला. यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं. काढणीला आलेला गहू, हरभरा आणि इतर पिकांचं नुकसान झालं. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.

वाशिममध्ये गारपीटमुळे नुकसान

गेल्या तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसा आणि गारपीट झाली आहे. आजही जिल्ह्यातील अनेक भागात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. गहू, हरबरा, कांदा बीज, भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान झालंय.

सोलापुरातही गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस

सोलापूर जिल्ह्यातही गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला. अक्कलकोट तालुक्यातील संगोळगी, जेऊर आणि रेल्वे स्टेशन परिसरात गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. यामुळे ज्वारी, गहू, द्राक्ष आणि डाळिंब पिकांचे नुकसान झालंय. या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. याशिवाय आज सोलापूर आणि अक्कलकोट शहर तालुक्यात ही वादळी वाऱ्यासह पाऊस

नंदूरबारमध्ये सलग पाचव्या दिवशी गारपीट

नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीदेखील अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे गारपीट झाली. तोरणमाळ हे राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये देखील अतिवृष्टीच्या फटका बसत आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या यात मोठे नुकसान होणार आहे. सलग पाच दिवसांपासून होत असलेल्या गारपिटी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे कोण करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही गारांचा पाऊस

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातही आज गारांचा पाऊस पडला. चंदनापुरी, साकुरसह अनेक गावात गारपीटीसह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेक पिकांना याचा फटका बसला. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, द्राक्ष यासह फुल शेतीलाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

पुण्यातील जुन्नर तालुक्यात गारपीट

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातही गारपीटसह जोरदार पाऊस पडला. जुन्नर तालुक्यात आज सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारच्या सुमारास जोरदार गारासह पावसाला सुरुवात झाली. जुन्नर तालुक्यातील निमगावसावा परिसराला पावसाने अक्षरश: झोडपले. रब्बी हंगामातील गहू, बाजरी पिकांना पावसाचा फटका बसला.

परभणीत शेतकऱ्यांचं नुकसना

परभणी जिल्ह्यात काही भागात वादळी वारे आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यात शेतीच्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. पूर्णा तालुक्यातील सुहागन, आवई आणि बरबडी या गावात अचानक झालेल्या गारपीटमुळे काढणीस आलेले गहू, ज्वारी, ऊस, कापुस, आंबा आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्थानिक आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेत लवकरच पंचनामे पूर्ण करून मदत देण्यासाठी शासन दरबारात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिलं.

वाशिम जिल्ह्यात रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच

गेल्या दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. त्यात मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी गावाला गारपिटीने चांगलेच झोडपून काढले. रस्त्यावर, शेतात, घराच्या छतावर गारांचा खच पडला होता. लिंबाच्या आकाराच्या गाराने परिसर बर्फ साचल्यागत पांढराशुभ्र झाला होता. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतातील लिंबू, डाळींब, संत्र्याच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या. तसेच गहू, हरभरा, बिजवाई कांदा, भाजीपाला, टरबूज पिकांचे प्रचंड नुकसान झालंय.