रंग बरसे… कुणी रंगानं भरलं तर कुणी चिखलात लोळलं, तर कुणाचा मासे, कोंबड्यांवर ताव… संपूर्ण राज्यात धुळवडीचा उत्साह शिगेला

संपूर्ण महाराष्ट्रात धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तरुणाईने रंगांसोबतच चिखलातही मनसोक्त आनंद लुटला. सिंधुदुर्ग, नागपूर, पुणे येथील जल्लोष विशेष होता. राजकीय नेत्यांनीही कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली. मासे, चिकन, मटण दुकानात ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे हा सण उत्साहात पार पडला.

रंग बरसे... कुणी रंगानं भरलं तर कुणी चिखलात लोळलं, तर कुणाचा मासे, कोंबड्यांवर ताव... संपूर्ण राज्यात धुळवडीचा उत्साह शिगेला
Dhulwad in Maharashtra
| Updated on: Mar 03, 2026 | 2:07 PM

आज संपूर्ण महाराष्ट्रात धुळवडीची धूम सुरू आहे. ग्रहण असलं तरी राज्यातील तरुणांनी धुळवड धडाक्यात साजरी केली आहे. चांद्यापासून बांद्यापासून रंग बरसेचा उत्साह आणि जोश पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच जिकडं पाहावं तिकडं कुणी रंगानं भरलंय तर कुणी चिखलानं माखलंय असेच दिसत आहेत. बच्चे कंपनी आणि महिलाही धुळवडीचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. थोरामोठ्यांपासून राजकारणी आणि सेलिब्रिटीही या सणाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहेत. धुळवड असल्याने चिकन, मटण आणि माश्यांच्या दुकानात ग्राहकांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस जागोजागी लक्ष ठेवून आहेत.

सिंधुदुर्गात धुळवड जोशात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज धुळवड म्हणजेच धुलिवंदनाचा उत्साह दिसून येत आहे. कुडाळ शहरातील दीड दिवसांचे धुलिवंदन सकाळपासून सुरू झाले असून डीजेच्या तालावर नाचत सर्वजण यामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तर प्रत्येकजण एकमेकांना रंग लावून धुलिवंदनाचा आनंद घेत होते. राजकीय नेते, युवक-युवती यांच्यासहित लहान मुलेही या धुलिवंदन सणात न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळाले.

नागपुरात लटमार होळी

नागपुरात पारंपारिक पद्धतीने होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आनंदम सोसायटीमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण एकत्र येत गुलाल उधळत आणि एकमेकांना रंग लावत आनंदोत्सव करत आहे. मथुरा आणि वृंदावन येथे ज्या पारंपारिक पद्धतीने ‘लटमार होळी’ साजरी केली जाते, त्याच धर्तीवर नागपुरातील वृंदावन सोसायटीमध्ये होळी साजरी करण्यात आली. महिलांच्या हातात काठ्या तर पुरुषांच्या हातात झाल घेऊन पारंपारिक खेळकर पद्धतीने होळी रंगली. डीजेच्या तालावर गुलालाच्या उधळणीत आणि उत्साही वातावरणात नागरिकांनी सणाचा आनंद लुटला. जुने राग-लोभ विसरून एकात्मतेचा संदेश देणारा हा उत्सव परिसरात आकर्षण ठरला.

तरुणाईकडून चिखलात मनसोक्त आनंद

रंगात रंगुनी रंग माझा वेगळा… धुळवडीच्या निमित्ताने सर्वत्र उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यातही हाच जल्लोष दिसत आहे. ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी धुळवडीच्या निमित्ताने चिखलामध्ये मनसोक्त आनंद लुटला. मातीशी आमचं घट्ट नातं आहे. त्यामुळे आम्ही या सणाचा आनंद घेत आहोत, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

रावसाहेब दानवेंसाठी गायलं भन्नाट गाणं

भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज भोकरदन येथील आपल्या निवासस्थानी शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांसोबत रंगाची उधळण करत मोठ्या आनंदात आणि उत्साहात धुलीवंदन साजरा केलाय. हातामध्ये स्वतः सिलेंडर घेत दानवे यांनी धुलिवंदना निमित्त आलेल्या कार्यकर्त्यावर रंगाच्या फवाऱ्याचा मारा केला. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्यासाठी कार्यकर्त्याने एक भन्नाट गाणं गायलं. त्यावेळी स्वतः रावसाहेब दानवे यांनी त्याच्यासोबत खंजिरी वाजवत गाण्याचा मनमुराद आनंद घेतला.

संतोष दानवेंचा रंगोत्सव

राज्यभरासह संपूर्ण देशामध्ये आज धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजकीय नेते मंडळी देखील या उत्सवात आपल्या कार्यकर्त्यांसोबत रंगाची उधळण करत आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. भोकरदनमध्ये भाजप आमदार संतोष दानवे यांनी आपल्या निवासस्थानी ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांसोबत रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली.

भास्कर जाधव यांनी नाचवली पालखी

कोकणात मोठ्या उत्साहात शिमगा उत्सव सुरू झाला आहे. शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी भेट दिली. ग्रामस्थांसमवेत त्यांनी ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे चिरंजीव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री. विक्रांत जाधव, माजी नगरसेवक समीर जाधव, योगेश जाधव, सिद्धेश जाधव, सुहास जाधव हे देखील सहभागी झाले होते.

अर्जुन खोतकर यांचं धुलीवंदन

राज्यभरासह संपूर्ण देशभरात काल होळी आणि आज धुलीवंदनचा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राजकीय नेते मंडळी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसोबत सहभाग घेताना पाहायला मिळतात. जालन्यात देखील शिवसेना आमदार, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना शहर वासियांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत नैसर्गिक फुलांपासून तयार केलेल्या रंगाची उधळण करत पारंपारिक पद्धतीने धुलीवंदन उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा केला आहे. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने शहरवासीय उपस्थित होते.

नागपूरमध्ये मटन आणि चिकनवर ताव

धुळवड निमित्त नागपूरातील मटन आणि चिकनच्या दुकानांत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात आज मटनाचे दर पोहोचले 900 ते 1000 रुपये किलोवर गेले आहेत. मागणी वाढल्याने आज मटन आणि चिकनच्या दरात 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. नागपुरात आज 10 हजार पेक्षा जास्त बोकडांच्या मटनच्या विक्रीचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यात आज चिकन, मटन, माश्यांची 50 कोटींपेक्षा जास्त उलाढालीचा अंदाज वर्तवला जात आहे.

Follow Us