पंतप्रधान मोदी मोठे संशोधक, त्यांनी नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरु करावा; आम्ही… संजय राऊतांचा खोचक टोला

आखाती युद्धामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या इंधन टंचाईवर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला असून, मिठी नदीतून गॅस निर्मितीचा प्रकल्प राबवण्याचा उपरोधिक सल्ला पंतप्रधान मोदींना दिला आहे.

पंतप्रधान मोदी मोठे संशोधक, त्यांनी नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरु करावा; आम्ही... संजय राऊतांचा खोचक टोला
pm narendra modi sanjay raut
| Updated on: Mar 11, 2026 | 10:33 AM

पश्‍चिम आशियात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता थेट महाराष्ट्राच्या उद्योग धंद्यांवर आणि इंधन बाजारावर उमटू लागले आहेत. या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. देशातील इंधन संकट दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाल्यातून गॅस निर्मितीच्या संशोधनाचा आता वापर करण्याची वेळ आली आहे, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

आखाती युद्धाच्या सावटाखाली खनिज तेल आणि गॅस वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद करण्यात आली आहे. यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, भारतात विशेषतः महाराष्ट्रात ऑटो एलपीजी आणि औद्योगिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील खालावलेल्या औद्योगिक स्थितीवर चिंता व्यक्त केली.

 मोदींच्या संशोधनाचा फायदा व्हायला हवा

सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील इंजिनिअरिंग प्लांट्सना गॅसची मोठी गरज असते. मात्र, पुरवठा थांबल्याने हे उद्योग आता पूर्णपणे संकटात सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि चाकण (पुणे) येथील ऑटोमोबाईल हबला इंधन टंचाईचा मोठा फटका बसला आहे. या संकटामुळे केवळ उद्योगच नाही, तर शेतकरी, कष्टकरी वर्ग, हॉटेल व्यावसायिक आणि टाईल्स उत्पादकही भरडले जात आहेत. पंतप्रधान मोदी हे एक मोठे संशोधक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी नाल्यातून गॅस निर्मिती करण्याचा शोध लावला होता. नाल्यात पाईप टाकून त्यातून निघणाऱ्या गॅसवर घरातील चुली पेटवता येतात, असे त्यांनी सांगितले होते. आता देशावर इंधनाचे संकट असताना मोदींच्या या संशोधनाचा फायदा देशाला व्हायला हवा,” असे संजय राऊत म्हणाले.

यमुना नदीवरही असाच प्रयोग करता येईल

मोदींच्या या संकल्पनेतून मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर गॅस निर्मितीचा पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू करावा. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना आवर्जून बोलवावे. या कामासाठी लागणारे पाईप्स किंवा इतर आवश्यक साहित्याची व्यवस्था शिवसेना म्हणून आम्ही करायला तयार आहोत. मिठी नदी यशस्वी झाली की यमुना नदीवरही असाच प्रयोग करता येईल, असेही संजय राऊतांनी म्हटले.

केंद्र सरकारचे भारताला शंभर वर्षे मागे नेण्याचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे गाड्या रस्त्यावर धावण्याऐवजी पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग येईल की काय, अशी भीती संजय राऊतांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, पण मोदी आणि त्यांचे भक्त या इंधन टंचाईवर एक शब्दही बोलायला तयार नाहीत अशी टीकाही त्यांनी केली.

Follow Us