माणिकराव कोकाटेंनी किती वेळ रम्मीचा डाव खेळला? विधीमंडळाच्या चौकशी अहवालात धक्कादायक बाब उघड

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात रम्मी खेळल्याचा आरोप आहे. आमदार रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. विधानमंडळाच्या चौकशीत कोकाटे १८ ते २२ मिनिटे रम्मी खेळत असल्याचे आढळले.

माणिकराव कोकाटेंनी किती वेळ रम्मीचा डाव खेळला? विधीमंडळाच्या चौकशी अहवालात धक्कादायक बाब उघड
manikrao kokate
| Updated on: Jul 30, 2025 | 9:57 AM

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या सुरु झाले होते. रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी, असा खणखणीत टोला विरोधकांकडून लगावण्यात आला होता. यावरुन विरोधकांकडून कृषीमंत्र्यांवर चौफेर हल्ला करण्यात आला. आता माणिकराव कोकाटेंबाबतचा विधीमंडळाचा चौकशी अहवाल समोर आला आहे.

रोहित पवारांचे नवीन ट्वीट काय?

आमदार रोहित पवार यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी माणिकराव कोकाटेंच्या रम्मी खेळताना आढळल्याच्या चौकशीबद्दलचा अहवाल शेअर केला आहे. कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरुन राज्याच्या कृषीमंत्र्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत माणिकराव कोकाटे हे सभागृहात बसलेले असताना मोबाईलवर जंगली रम्मी खेळत असल्याचे पाहायला मिळत होते. या व्हिडीओला रोहित पवारांनी कॅप्शन देत जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…! असे म्हटले होते.

“सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?” असा सवाल रोहित पवारांनी विचारला होता.