
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघाताच्या धक्क्यातून अजूनही लोक सावरलेले नाहीत. राज्यातील जनतेसाठी हा अत्यंत मोठा धक्का होता. अजितदादा आपल्यात नाहीत यावर कुणाचाही विश्वास बसत नाहीये. ही घटना ताजी असतानाच राज्याचा आणखी एक मंत्री अपघातातून थोडक्यात बचावला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अपघातातून बचावले आहेत. त्यांनीच स्वत:ही माहिती दिली. काल माझ्या कारचा अपघात झाला. थोडक्यात वाचलो. नाही तर आज माझ्या श्रद्धांजलीची वेळ आली असती, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने काल छत्रपती संभाजी नगर येथे संजय शिरसाट यांची प्रचाराची सभा होती. यावेळी त्यांनी भाषण करताना काळ वेळ कशी सांगून येत नाही हे मतदारांना सांगत असतानाच त्यांच्या अपघाताचा किस्साही सांगितला. शिरसाट यांनी अपघाताच किस्सा सांगताच उपस्थितांच्या काळजात काही वेळ कालवा कालव झाली. हा किस्सा सांगितल्यानंतर आजचा दिवस आजच जगा. आजचा दिवस आजच चांगला घालवा. उद्यावर विसंबून राहू नका, असं संजय शिरसाट म्हणाले.
टायर फुटले अन्…
कालची घटना सांगतो, माणसाचा काही भरवसा नाही. अजितदादा गेले की नाही? कुणाला वाटलं होतं का असं काही होईल? काल माझी ही बारी आली होती. थोडक्यात वाचलो. येताना माझी गाडी एका खड्डयात आदळली आणि कारचे दोन्ही डावे टायर फुटले. मर्सिडीज गाडी होती. दुसरी गाडी इनोव्हा होती. ती घरी आतापर्यंत आली नाही. काय भरवसा नाही माणसाच्या आयुष्याचा. काल काही बरं वाईट झालं असतं तर तुम्ही मला आज श्रद्धांजली वाहिली असती. पण पुण्य केल्याच्या जोरावर आज मी जिवंत आहे, असं शिरसाट म्हणाले.
मी सर्वांना सांगतो. तुम्हाला मिळालेला आजचा दिवस चांगला घालवा. उद्याच्या दिवसाची चिंता करू नका. उद्याचा दिवस निघो अथवा नको निघू. ही ताकद जेव्हा तयार होते. तेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चिंता राहत नाही. उमेदवारांनो टेन्शन घेऊ नका. मी जेवढा नम्र वागतो तेवढंच तुम्हीहीह लोकांशी नम्र वागा. अर्विभावात जाऊ नका. हे मतदार आहेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
सर्वाधिक बजेटवाला आमदार
तुमच्या मतदारसंघात काहीच कमी पडणार नाही. काही कमी पडलं तर मी मंत्री आहे ना. राज्यात सर्वाधिक बजेटवाला मंत्री मी आहे ना. साडे बावीस हजार कोटी रुपयांचं बजेट माझ्या एकट्याचं आहे. साडे बावीस हजार कोटीला किती झिरो लावायचे त्याला विचारून घ्या. हा पैसा आहे आपल्याकडे म्हणून मला लोकं बजाज नगरचा आमदार म्हणतात. मी आमदार कुठला आहे, बजाज नगरचा, अशी टोलेबाजी त्यांनी केली.
तुमच्यामुळेच जिवंत
दुसरा उमेदवार आहे. फोन पे करतोय. अरे फोन पे ही काय भानगड आहे? म्हणे मतदारांना विकत घेऊ. त्यांना फोन पेवर पैसे टाकू. अरे चांगले धंदे कर. कशाला नादाला लागतो? लोकांना मूर्ख बनवणं एवढं सोपं आहे का? ही सत्ता लोकांसाठी असते. मी किती मोठा झालो याला महत्त्व नाही. मी लोकांसाठी काय करतो हे महत्त्वाचं आहे. ते काम केलं पाहिजे. त्यासाठी सत्ता असते. गेल्या 20 वर्षापासून मी आमदार आहे. कधी तरी तुम्हाला वाटलं का हा आमदार आहे, मंत्री आहे म्हणून. आपल्या घरातला वाटतो ना? माझं कुटुंब तुमच्यासोबत काम करतं. मी पालक मंत्र्यांची बायको आहे, मी पालकमंत्र्यांची मुलगी आहे, असं कधी आम्ही दाखवलं का? आम्ही हे समजतो की आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांच्या आशीर्वादावर आपण जिवंत आहोत. तुमचा आशीर्वाद पाठिशी आहे, म्हणून आम्ही आहोत, असंही ते म्हणाले.