
गेल्या महिन्यात राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महानगरापालिकांच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली आणि एकच रणधुमाळी उडाली. अवघ्या काही दिवसांवर निवडणूक आली असून 15 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. विजयाचा गुलाल कोण उधळणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असली तरी त्याआधी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. मात्र निवडणुकीपूर्वीच्या प्रक्रिया सध्या वेगाने सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरूवात झाली आहे.
याचदरम्यान ज्येष्ठ ज्योतीषाचार्य डॅा. अनिल वैद्य यांनी याबाबत काही भाष्य केलं असून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज कधी भरावा, कोणता मुहूर्त शुभ आहे आणि कोणत्या तारखेला अर्ज भरणं टाळीवं, हे स्पष्टपणे सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर या निवडणुकीत कोणाचा विजय होणार याचं भाकीतही त्यांनी केलं आहे. काय म्हणाले ज्योतीषाचार्य डॉ. वैद्य, ते सविस्तर जाणून घेऊया.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुभ मुहूर्त कधी ?
ज्योतीषाचार्य डॉ. वैद्य यांच्या सांगण्यानुसार, महानगरपालिका निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी – शनिवारी 27 तारखेला दुपारी 2 ते 5 चांगला मुहूर्त आहे, तर 28 तारखेला मध्यम दिवस आहे. सोमवार 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 आणि दुपारी 12.30 ते 5 हा शुभ मुहूर्त आहे. मात्र मंगळवार 30 डिसेंबर रोजी शुभ मुहूर्त नाही, त्यामुळे या दिवशी उमेदवारांनी अर्ज भरणं टाळावं अशी माहिती ज्योतीषाचार्य डॅा. अनिल वैद्य यांनी दिली.
उमेदवारी अर्ज भरताना पुणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, मुंबईतून मुहूर्त विचारण्यासाठी अनेक फोन येतात असंही त्यांनी नमूद केलं.
महापालिका निवडणुकीत कोणाला मिळणार यश ?
या माहापिलाक निवडणुकीत खूप चुरशीचं वातावरण असून विजयासाठी सर्वच उत्सुक आहेत. मात्र तरीही विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबतही डॉ. वैद्य यांनी भाकीत केलं आहे. ” सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांना साडेसाती आहे, पण महानगरपालिका निवडणुकीत महायुतीलाच यश मिळणार ” असं ते म्हणाले. राज्यातीलसर्वच महानगरपालिकेत महायुतीला यश मिळणार असंही त्यांनी नमूद केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ग्रहमान सर्वात चांगलं असून दुसऱ्या नंबरवर ते असतील असही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडवणीसांची साडेसाती सुरू, पण जून…
मुख्यमंत्री फडणवीस यांना सध्या साडेसाती लागली असून जून 2027 पर्यंत त्यांना साडेसाती असेल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, जून 2027 नंतर केंद्र सरकारमध्ये फडणवीस यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं भाकीत त्यांनी केलं. एवढंच नव्हे तर भविष्यात देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदाच्याही रेसमध्ये असतील असंही ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीच्या महत्त्वाच्या तारखा
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली. 29 महापालिकेमधील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे. या महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असा असणार आहे, तर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.
राज्यात कोणकोणत्या महापालिकांची निवडणूक होणार ?
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, भिवंडी निजामपूर, मिरा भाईँदर, वसई विरार, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाडा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर या महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)