उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उरले फक्त काही तास, उमेदवारीसाठी वेटिंगवाले टेन्शनमध्ये… काय काय घडतंय?

राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये उमेदवारांची धावपळ सुरू असून, एबी फॉर्मसाठी लॉबिंग केली जात आहे. युती-आघाडीच्या निर्णयामुळे काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी उमेदवारांना मोठा ताण आहे. आज सायंकाळपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उरले फक्त काही तास, उमेदवारीसाठी वेटिंगवाले टेन्शनमध्ये... काय काय घडतंय?
उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांची फिल्डिंग
| Updated on: Dec 30, 2025 | 10:52 AM

राज्यात काही ठिकाणी पाच वर्षानंतर तर काही ठिकाणी त्याहून अधिक काळाने महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. राज्यातील मुंबईसह एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वच आजीमाजी नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली आहे. काहींना उमेदवारी मिळाली आहे. तर काहींना अद्यापही उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने आज वेटिंगवाल्यांना प्रचंड टेन्शन आलं आहे. तर काही लोकांना युती किंवा आघाडी होते की नाही याचं टेन्शन आलं आहे. मात्र, आपल्याच पदरात उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी सकाळपासूनच लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. नेत्यांच्या गाठीभेटी घेणं, फोनवरून संवाद साधणं आणि शक्तीप्रदर्शन करणं किंवा अन्य पर्यायाचा शोध घेणं यावर अनेकांनी भर दिला आहे. मात्र, या रणांगणात कोण उतरणार हे आज संध्याकाळपर्यंतच स्पष्ट होणार आहे.

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची आज शेवटची तारीख असून अद्यापही कित्येकांना एबी फॉर्म न मिळाल्याने धाकधूक वाढली आहे. मुंबईत आज दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून उर्वरित मनपांमध्ये अर्ज स्वीकारण्याची वेळ संध्यकाळी 5 पर्यंत आहे.

कोणाला वाटप, कोणाला झटका ?

दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून मुंबईत आत्तापर्यंत 135 एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहेत, मात्र असे असले तरी पक्षाकडून दोन उमेदवारांचे एबी फॉर्म अद्यापही वेटिंगवर आहेत. तर दुसरीकडे आमदार आणि माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना झटका बसला आहे. कारण विद्या ठाकूर यांचा मुलगा आणि विद्यमान नगरसेवक दीपक ठाकूर यांचा पत्ता कट झाला आहे. वॉर्ड क्रमांक 50 मधून भाजप कार्यकर्ता विक्रम राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 50 हा ओबीसी आरक्षित झाल्यामुळे दीपक ठाकूर यांना वॉर्ड कमांक 55 मधून उमेदवारी हवी होती . मात्र आता वॉर्ड क्रमांक 55 मधून विद्यमान नगरसेवक हर्ष भार्गव पटेल यांना उमेदवारी देण्यात आल्याने ठाकूर यांच्या पदरी निराशा पडली आहे.

केडीएमसी निवडणूक उमेदवारी अर्जाचा आज अंतिम दिवस, फॉर्म उशीरा मिळाल्यामुळे प्रभाग कार्यालयांत गर्दी

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 122 नगरसेवकांसाठी 31 प्रभाग असून केडीएमसीतील नऊ निवडणूक प्रभाग कार्यालयात निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. पक्षातील नाराज उमेदवार फुटू नयेत म्हणून महायुती व महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांना उशिरा ए–बी फॉर्मचे वाटप करण्यात आले . उशिरा फॉर्म मिळाल्याने आज सकाळपासून कार्यालयांबाहेर उमेदवारांची मोठी गर्दी झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. दिवसभरात मोठ्या प्रमाणात या निवडणूक प्रभाग कार्यालय उमेदवाराची गर्दी होणार असल्याने अंतिम दिवशी अर्ज दाखल करताना गोंधळ टाळण्यासाठी हा कडक बंदोबस्त असून प्रशासन देखील सज्ज झालेला पाहायला मिळत आहे

वाहतुकीत मोठा बदल

डोंबिवलीत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. फडके रोड ,एच प्रभाग व पूर्वेतील जी आणि एफ प्रभाग सह निवडणूक कार्यालयांजवळील रस्ते सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत बंद राहतील. तसेच केडीएमसी निवडणूक पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील प्रभाग कार्यालयांजवळ वाहतुकीवर निर्बंध असून आज सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. डोंबिवली पश्चिमेतील एच प्रभाग व पूर्वेतील जी आणि एफ प्रभाग कार्यालय परिसर प्रभावित असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. ठाकुर्ली–फडके रोड–गणेश मंदिर मार्गावर काही प्रवेश पूर्णपणे बंद तर पी. पी. चेंबर्स, सुनीलनगर, उमेशनगर परिसरात प्रवेशबंदी व पर्यायी रस्ते सुरू राहतील.

पुण्यात शिवसेनेत नाराजी सत्र

तर दुसरीकडे पुण्यात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रात्रभर खलबतं सुरू होती. काल पुण्यातील 60 हून अधिक इच्छुकांना एबी फॉर्म वाटले. मात्र रात्री मुंबईतून वरिष्ठाकडून युतीचा निरोप असल्याने ए.बी. फॉर्म माघारी घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अखेर शिवसेना आणि भाजप युती हे दोन्ही पक्ष युतीतच लढणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सेनेने काल स्वबळावर लढण्याची तयारी केली होती त्यामुळे 60 हून अधिक इच्छुंकाना AB फॉर्म देण्यात आले होते. आबा बागुल , तानाजी सावंत यांचा मुलगा गिरीराज सावंत, रविंद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. पण आता ऐनवेळी निर्णय बदलल्याने सेनेत पुन्हा नाराजीसत्र सुरू झालं आहे.

चंद्रपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी बोलणी फिस्कटली

दरम्यान चंद्रपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती साठी बोलणी सुरू होती, मात्र अखेर ही बोलणी फिस्कटली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर उमेदवार देणार आहे. तसेच काँग्रेस आणि आरपीआय (खोरिपा) यांच्यातील युतीची शक्यता देखील मावळली, काँग्रेस चंद्रपूर महानगरपालिकेत 66 पैकी 66 जागांवर निवडणूक लढणार हे आता निश्चित झालं आहे.

छत्रपती संभाजी नगर मध्येही भाजपा शिवसेना युती फिस्कटली असून दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षात वाद झाल्याने आता दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार आहेत.

शिवसेना आमदाराच्या मुलापायी तीन वॉर्डमध्ये अदलाबदली

शिवसेना आमदाराच्या मुलापायी तीन वॉर्डमध्ये अदलाबदली झाली आहे. आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासाठी दोन उमेदवारांचे वॉर्ड बदलण्यात आले आहेत. वॉर्ड क्रमांक 5 वर शिवसेनेचे संजय घाडी, तर भाजपच्या प्रकाश दरेकरांमध्ये रस्सीखेच होती.  अखेर प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याला वॉर्ड क्रमांक 5मधून उमेदवारी देण्यात आली असून स्थानिक नगरसेवक संजय घाडींना वॉर्ड 4मधून निवडणूक लढावी लागणार आहे.  तर वॉर्ड 3 मध्ये नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचा पत्ता कट झाला असून प्रकाश दरेकर यांची उमेदवारी वॉर्ड 3मधून घोषित करण्यात आली आहे.

आमदार पुत्राच्या बालहट्टपायी शिवसेनेत नाराजी आहे.  मंगेश पांगारे यांनी वॉर्ड क्रमांक चार मधून तयारी केली होती मात्र संजय घाडींचा वॉर्ड बदलल्याने मंगेश पांगारे हे सुर्वेंवर नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.