मी सरन्यायाधीश चंद्रचूड बोलतोय… महिलेला डीजिटल अरेस्ट करून पावणे चार कोटींची लूट; थेट कनेक्शन गुजरातशी…
मुंबईत ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका 68 वर्षीय महिलेची 3.71 कोटी रुपयांची फसवणूक झाली. आरोपींनी स्वतःला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड असल्याचे भासवून महिलेला धमकावले आणि तिची ऑनलाइन चौकशीही केली. सायबर क्राईम शाखेने या प्रकरणी गुजरात येथून एका आरोपीला अटक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशभरात डीजिटल अरेस्टचे प्रकार वाढत आहेत. पोलीस अधिकारी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून ज्येष्ठांना लुटलं जात आहे. आता या डीजिटल अरेस्टवाल्यांनी तर हद्दच गाठली आहे. मुंबईत एका 68 वर्षीय महिलेला मी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड बोलतोय असं सांगून 3.71 कोटींना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असून आम्ही केंद्रीय एजन्सीचे कर्मचारी असल्याचंही या ठकसेनांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेची ऑनलाईन कोर्ट सुनावणीही केली. यावेळी एका आरोपीने मी स्वत:ची ओळख माजी सरन्यायाधीश चंद्रचूड अशी करून दिली होती.
या प्रकरणाची सायबर क्राईम ब्रँचने गंभीर दखल घेतली आहे. सुरतवरून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या खात्यात 1.71 कोटी रुपये ट्रान्स्फर झाले होते. एका बोगस कपड्याच्या कंपनीच्या नावाने त्याने अकाऊंट उघडलं होतं. त्याबदल्यात त्याला 6.40 लाखांचं कमिशन मिळालं होतं.
दोन महिने फसवणूक
फसवणूक झालेली महिला अंधेरी पश्चिमेला राहते. हे लोक संबंधित महिलेवर नजर ठेवून होते. 18 ऑगस्ट रोजी त्यांनी या महिलेला फोन केला. मी कुलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी बोलतोय असं या व्यक्तीने महिलेला सांगितलं. तुमच्या बँक खात्याचा वापर मनी लाँड्रिंगसाठी होत असल्याचं त्याने सांगितलं. तसेच तिला धमकावलं आणि कुणाला काही सांगितलं तर तुमच्यावर कारवाई होईल अशी भीती घातली. त्यानंतर त्यांनी महिलेकडून बँकेची डिटेल्स मागितली. त्यानंतर आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार असल्याचं तिला सांगितलं. त्यामुळे महिला घाबरली.
निबंध लिहायला सांगितला
आरोपीने आधी या महिलेला तिच्या आयुष्यावर दोन ते तीन पानी निबंधही लिहायला सांगितलं. त्यानंतर त्याने तिला तू निर्दोष असल्याचं मला वाटतंय. आम्ही तुला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं.
आरोपीने त्याचं नाव एसके जयस्वाल असल्याचं सांगितलं. व्हिडीओ कॉल करून तिची एका व्यक्तीसोबत भेट घालून दिली. त्या व्यक्तीने आपण सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस चंद्रचूड असल्याचं सांगितलं. त्याने या महिलेकडून गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्र मागितले. या नंतर महिलेने दोन महिन्यात पावणे चार कोटी रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्फर केले. त्यानंतर तिला परत कधीच फोन आले नाही. त्यामुळे या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
महिलाने वेस्ट रिजन सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत महिलेचा पैसा अनेक म्यूल खात्यात गेल्याचं दिसून आलं. त्यातील एक व्यक्ती गुजरातच्या सुरतमधील असल्याचं कळलं. पोलिसांनी त्याला अटक केली. या आरोपीने या रॅकेटच्या दोन मास्टरमाइंडची माहिती दिली आहे. त्यातील एक आरोपी परदेशात असून दुसरा एमिग्रेशन आणि व्हिसा सर्व्हिसचा बिझनेस करतोय.
