
महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. या निवडणुकांचा प्राथमिक कल आणि जनमताचा अंदाज घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचा दावा केला आहे. मराठवाड्यात भाजप मोठा भाऊ म्हणून समोर येईल, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. जालन्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.
आजचे निकाल हे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरतील. महायुती केवळ सत्तेत येणार नाही, तर दोन तृतीयांश बहुमत मिळवून ५१ टक्क्यांहून अधिक मताधिक्य घेईल. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या विकासकामांवर पूर्ण विश्वास दाखवला आहे, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाड्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. मराठवाड्यात महायुतीची कामगिरी अभूतपूर्व असेल. या भागात काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाला डोकं वर काढायला जागा उरणार नाही. मराठवाड्यात भाजप हा मोठा भाऊ म्हणून समोर येईल. विकासाच्या मुद्द्यावर लोक भाजपच्या पाठीशी उभे राहिले आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
काँग्रेस हा आता देशातील तसेच राज्यातील सर्वात मागासलेला आणि माघारलेला पक्ष झाला आहे. त्यांनी जनतेचा कौल स्वीकारून आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. चुकीच्या धोरणांमुळेच काँग्रेसला ही परिस्थिती भोगावी लागत आहे. हरलेले लोक नेहमीच अशाच प्रकारची विधाने करतात. पराभूत मानसिकतेतून बाहेर येणे त्यांना कठीण जात आहे. वास्तवाचे भान नसलेले लोक अशा प्रकारची टीका करतात, पण जनता त्यांना निकालातून उत्तर देईल, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी डबल इंजिन सरकारची गरज आहे. महापालिका आणि नगरपालिकांच्या माध्यमातून शहरांचा कायापालट करण्याचे व्हिजन केवळ महायुतीकडेच आहे. हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी जनता आम्हाला नक्कीच कौल देईल, असे बावनकुळेंनी म्हटले.
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामठीतील जनतेने नेहमीच भाजपला भरभरून प्रेम दिले आहे. येथील विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी जनता पुन्हा एकदा महायुतीच्या पाठीशी उभी राहिली आहे. कामठी आणि परिसरातील नगरपालिकांमध्ये विरोधकांचा सुपडा साफ होईल, अशा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.