Maharashtra News LIVE : उद्या कोणत्याही मंत्र्यांना अडवू नका, त्यांच्या दारात मुंबईत जाऊन आपण अडवू – जरांगे पाटील
Maharashtra News LIVE : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मात्र, त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी आयसीयूत दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. यावेळी ज्येष्ठ वकील नीरज कौल हे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पक्षाची बाजू न्यायालयात मांडणार आहेत, या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. परंतु अजूनही त्यांना मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळालेली नाहीये, राज्यात गणरायाच्या आगमनासोबतच पावसाचं देखील आगमन झालं आहे. राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. यासोबतच आपण विविध बातम्या आणि घडामोडी जाणून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्याचा विकास व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही – अंबादास दानवे यांची टीका
मराठवाड्याचा विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. या सरकार ने 10 वर्षांत 780 घोषणा केल्या, त्याची यादी आमच्याकडे आहे. ह्या 780 घोषणा आम्ही आठही जिल्ह्यांच्या काढल्या आहेत. हे सरकार नामर्दाचं आहे, फक्त दीड टक्का काम झालंय. म्हणून आम्ही ‘तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन मराठवाडा भर केलं – अंबादास दानवे
-
धाराशिव – दुष्काळी परिस्थिती अन् नापिकीला कंटाळून 28 वर्षीय शेतकऱ्याने संपवलं आयुष्य
धाराशिव – दुष्काळी परिस्थिती अन् नापिकीला कंटाळून 28 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे ही धक्कादायक घटना घडली. राम शरद गुरव असे मृत शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्याकडे 7 एकर शेती होती. मात्र पावसाअभावी शेतातील पीक करपून गेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 40 दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने पिकांचे नुकसान झालं. शेतीचं उत्पन्न नष्ट झाल्याने आर्थिक संकटाची चिंता होती ,याच विवंचनेतून गुरव यांनी आयुष्य संपवल्याची माहिती समोर येत आहे.
-
-
पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्र्यांचं घेणार विचारमंथन सत्र
केंद्रीय मंत्र्यांना पुढील आठवड्यात दिल्लीतच थांबण्यास सांगण्यात आलं आहे. 23 आणि 24 सप्टेंबर रोजी हे विचारमंथन सत्र आयोजित केलं आहे. या बैठकीदरम्यान तीन ते चार प्रेझेंटेशन्सही होणार आहेत.
-
मुंबईत येऊ देणार नाही म्हणणाऱ्या मंत्र्यांना वातावरण चिघळवायचं आहे – जरांगे पाटील
जरांगेंना मुंबईच्या वेशीपर्यंत येऊ देणार नाही, असं विधान करणाऱ्या मंत्र्यांना जरांगेंचं चोख प्रत्युत्तर. मुंबईत येऊ देणार नाही म्हणणाऱ्या मंत्र्यांना वातावरण चिघळवायचं आहे का, तुझ्या घरात घुसणार मराठे सगळे – असं आव्हान जरांगेंनी दिलं.
-
बीड – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी येणार
बीड – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. ते मुंबईतून थोड्याच वेळात निघणार आहेत, अशी माहती सुत्रांनी दिली आहे. सरकारकडून जरांगे पाटलांना ड्राफ्ट दिला जाणार, तोडगा काढण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे.
-
उद्धव बाळासाहेब ठाकरे थोड्याच वेळात छत्रपती संभाजी नगरमध्ये होणार दाखल
उद्धव बाळासाहेब ठाकरे थोड्याच वेळात छत्रपती संभाजी नगर मध्ये दाखल होणार आहेत. शहरातील सिद्धार्थ उद्यानामध्ये मराठवाडा मुक्ति संग्राम दिना निमित्ताने स्मृती स्तंभास ते अभिवादन करतील.
-
परभणी – आरक्षण मिळत नाही या विवंचनेतून एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केल्याचा आरोप
मराठा आरक्षण मिळत नाही या विवंचनेतून परभणीच्या पोखर्णी येथे एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला आग लावत आत्महत्या केली असा नातेवाईकांचा आरोप आहे. गोविंद नारायण वाघ असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळेर परिसरात शोककळा पसरली असून, या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-
बीड - उद्या कोणत्याही मंत्र्यांना अडवू नका, त्यांच्या दारात मुंबईत जाऊन आपण अडवू – जरांगे पाटील
बीड - उद्याचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा आहे. आपल्याला अन्याय, अत्याचारापासून मुक्ती मिळालेली आहे. तरी आपल्या दारात आलेल्या मंत्र्यांना कोणीही अडवू नका, घोषणाबाजी करू नका, आपण त्यांना त्यांच्या दारात मुंबईत जाऊन अडवू असं सांगत जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना उद्या कुठल्याही प्रकारचे आंदोलन किंवा मंत्र्यांना आडवा आडवी करू नये असं आवाहन केलं.
-
साखरेची एफआरपी ५० रुपये करा- राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत.. मागील ८ वर्षांपासून ३१ रुपये असलेली साखरेची एफआरपी वाढवून ती ५० रुपये करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. याबरोबरच पेट्रोलचे दर वाढवताना इथेनॉलची खरेदी किंमत वाढवून ७० रुपये करावी असं राजू शेट्टी म्हणाले.
-
उद्या मुंबईला जाण्यावर ठाम-जरांगे पाटील
उद्या मुंबईला जाण्यावर ठाम. मी मरायला तयार आहे. मी टोकाच्या भूमिकेत आलो आहे. मराठ्यांचा असा अपमान केला तर फडणवीसांना वाईट दिवस बघावे लागणार असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
-
मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर योजनांसाठी, विशेषतः लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सामाजिक न्याय विभागाचे तब्बल 4 हजार 601 कोटी रुपये इतरत्र वळवण्यात आल्याचा दावा करत हा निधी पुन्हा सामाजिक न्याय विभागाला देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात मी चोर आहे, मी समाज कल्याण खात्याचे पैसे चोरले असे बॅनरही झळकले. निधी परत केला नाही तर मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन छेडू, असा इशारा वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
-
एमी फाऊंडेशन तर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
एमी फाऊंडेशन तर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल. आझाद मैदानावर होणाऱ्या प्रस्तावित मराठा आरक्षण आंदोलनासाठी परवानगी न देण्याचे निर्देश देण्याची मागणी. एमी फाऊंडेशन ने दाखल केलेल्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे.
-
मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच वेळी संभाजीनगरच्या दौऱ्यावर
मराठवाडा मुस्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उबाठा शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे आज हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणार आहेत. फडणवीस उद्या ध्वजारोहण करून हुतात्मा स्मारकाला अभिवादन करणार आहेत. तर मराठवाड्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे उद्या आंदोलन करणार आहेत.
-
पुण्यात मोहोळांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
पुण्यात मोहोळांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोहोळांच्या घरी दाखल झाले होते. आठ ते 10 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जरांगेंच्या मागण्यासंदर्भात भेट घेण्यासाठी आंदोलक आले होते.
-
अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
-
आम्ही भाजपबरोबरही जाणार नाही आणि काँग्रेसमध्ये विलिन होणार नाही- रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विलिनिकरणाची चर्चाच नाही तर मी त्यात असण्याचा प्रश्नच नाही, असं रोहित पवार म्हणाले. मी माझं काम करतोय. आम्ही भाजपबरोबरही जाणार नाही आणि काँग्रेसमध्ये विलिन होणार नाही. इंडिया आघाडीबरोबर राहून आम्ही लोकांची भूमिका मांडत राहू. आमची हिम्मत आहे की आम्ही भाजपविरोधात लढू शकतो. जे आज सत्तेत आहेत त्यांची हिम्मत आहे का भाजपला सोडायची? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
-
43 वी आयसीजी कमांडर्स परिषद 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत सुरू होणार
भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) कमांडर्स परिषदेची 43वी आवृत्ती 17 ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान नवी दिल्लीतील तटरक्षक दलाच्या मुख्यालयात आयोजित केली जाईल. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ उद्घाटनप्रसंगी सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करतील. त्यांच्या भाषणातून, भारतीय तटरक्षक दलाला अधिक मजबूत करण्यासाठी आणि सागरी हितसंबंध व राष्ट्रीय सुरक्षेच्या संरक्षणातील त्याची भूमिका वाढवण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला जाईल.
-
१८ तारखेला माझ्यासह सतरा लोक आझाद मैदानात पोहचणार – मनोज जरांगे पाटील
मी १८ तारखेला मुंबईला जाणार म्हणजे जाणारच असे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मला सलाईन लावण्यात येत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजता माझ्यासह सतरा लोक आझाद मैदानात पोहचणार आहेत. कोण मला अडवते ते पाहातो असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
-
मी जास्तच आक्रमक आहे ,म्हणून कदाचित माझी चर्चा – रोहित पवार
आज लोकांसाठी भूमिका घेणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात खूप अडचणी आहेत. आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आम्ही लढत आहोत. युवा असल्यामुळे मी जास्तच आक्रमक आहे. त्यामुळे कदाचित आमची जास्त चर्चा असावी असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
-
मराठा क्रांती मोर्चाकडून शिबिराच्या ठिकाणी जाऊन त्रुटींची चाचपणी
धाराशिव जिल्ह्यात कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या शिबिराला मराठा समाजाकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे कुठे दोन तर कुठे चार अर्ज शिबिरामध्ये येत असल्याची माहिती आहे. आज तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे आयोजित केलेल्या या शिबिराच्या कामकाजाची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून पाहणी केली जात आहे. शिबिरांमध्ये मराठा समाजातील नागरिकांना काही अडचणी येत असल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये प्रतिबंधात्मक आदेश
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. शिंगोली सर्किट हाऊस ते शिवाजी महाराज पुतळा ते पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात आंदोलनांना बंदी घालण्यात आली आहे. मोर्चा, रॅली, धरणे, उपोषण, आत्मदहन, रास्ता रोकोला प्रतिबंध, ध्वनिक्षेपक वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे. १६ सप्टेंबर मध्यरात्रीपासून १७ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू असेल. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाचा निर्णय, पोलीस बंदोबस्त ही वाढवल्याची माहिती आहे.
-
गणरायाकडे प्रार्थना, मनोज जरांगेंना लवकर बरं कर – छगन भुजबळ
मनोज जरांगे यांच्या तब्येतीवर भुजबळ यांनी भाष्य केलं. मनोज जरांगे यांची तब्येत लवकर बरी व्हावी, ते मुंबई आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ते मुंबईत आल्यास अराजकता निर्माण होऊ शकते, असेही छगन भुजबळ म्हणाले. आतापर्यंत जरांगे हे मला एकट्यालाच शिव्या द्यायचे, आता सगळ्यांना शिवीगाळ करताहेत, असे भुजबळ म्हणाले.
-
रायगडमध्ये बल्क ड्रग पार्क विरोधात भव्य निर्धार सभा
“बल्क ड्रग पार्क हटाव, असा एल्गार भरत गोगावले यांनी केला. घातक कंपन्या नकोत; जनतेच्या हिताशी तडजोड नाही. रोह्यातून रद्द झालेला प्रकल्प माणगावात का? वाटा नको, घाटा नको; आम्हाला एमआयडीसीच नको, असे ते म्हणाले.
-
मराठा क्रांती मोर्चाच्या समितीकडून आझाद मैदानाची पाहणी
मराठा क्रांती मोर्चाच्या समितीकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. परवानगीबद्दल तेढ असताना आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली. स्टेज आणि इतर सोयी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे प्रमोद सावंत आणि इतर जण पाहणी करत आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक
मनोज जरांगे पाटलांना प्रवास टाळण्याबाबत आणि रुग्णालयात भरती होण्याबाबत कालच जालना जिल्हा शल्य चिकित्सकांकडून सल्ला देण्यात आला होता. उपोषणामुळे तीव्र Dehydration झालं. तसेच मेंदू, यकृत आणि किडनी कायमच्या निकामी होण्याचा मोठा धोका आहे. लघवीच्या अहवालात ‘किटोन’ आढळले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रवास करणे अत्यंत जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे असा कालचा अहवाल होता तरीसुद्धा 24 तास कुठलेच पाणी न घेतल्याने प्रकृती अधिक खालावली आहे.
-
उद्याही कोर्टात सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संपली आहे. उद्याही कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
-
शिंदेंच्या मुख्य नेत्याबद्दल काैल यांचा मोठा युक्तीवाद
निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही. शिंदेंची मुख्य नेता म्हणून केलेली निवड चुकीची नव्हती, असा मोठा युक्तीवाद काैल यांनी केला.
-
चिन्हाचा निकाल देताना विधीमंडळातील संख्या महत्वाची- काैल
चिन्हाचा निकाल देताना विधीमंडळातील संख्या महत्वाची असल्याचे काैल यांनी म्हटले आहे.
-
निवडणूक आयोग ही महत्वाची संस्था- काैल
निवडणूक आयोग ही महत्वाची संस्था असल्याचे काैल यांनी कोर्टात म्हटले. विधीमंडळात पक्ष महत्वाचा असल्याचेही काैल यांनी म्हटले.
-
ही तर एकाधिकारशाही झाल्याचे मोठे विधान काैल यांनी केले.
ही तर एकाधिकारशाही झाल्याचे मोठे विधान काैल यांनी केले. पक्षात लोकशाही राहिली नसल्याचेही त्यांनी म्हटले.
-
ठाकरेंकडून पक्षाला वैयक्तीक संघटनेसारखा वापर-काैल
ठाकरेंकडून पक्षाला वैयक्तीक संघटनेसारखा वापर करण्यात आला. पक्षात लोकशाही कुठे आहे? असाही सवाल काैल यांनी उपस्थित केला.
-
पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा विषय महत्वाचा- काैल
नुकताच शिवसेना शिंदे गटाकडून कोर्टात युक्तीवाद सुरू झाला. पक्षातील अंतर्गत लोकशाहीचा विषय महत्वाचा महत्वाचा आहे.
-
शिंदेंवर आक्षेप घेण्याचा प्रयत्नच नाही- काैल
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू झाली. शिंदेंवर आक्षेप घेण्याचा प्रयत्नच नाही काैल यांनी युक्तीवाद केला.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी काही वेळातच सुरू होईल.
-
नाशिक – ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते आणि महापौरांमध्ये जुंपली
खड्ड्यांच्या मुद्द्यावर बोला आणखी किती लोकांचा बळी घेणार असा सवाल करत महापौर आणि ठाकरे गटाचे गटनेचे केशव पोरजे यांच्यात खडाजंगी झाली आहे. लक्षवेधी होऊ द्या नंतर त्यावर बोलू अशी भूमिका महापौरांनी घेतली. महापौर आणि ठाकरे यांचे गटनेते केशव पोरजे यांच्यात खडाजंगी झाल्याने महासभेत गोंधळाचे वातावरण झालं.
-
जरांगे पाटील अजुन पाटोद्यातच, बेशुद्ध झाल्याने तातडीचे उपचार
जरांगे पाटील अजुन पाटोद्यातच सकाळी 10 वाजता निघणार होते पण बेशुद्ध झाल्याने तातडीचे उपचार सुरू करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सकांसह वैद्यकीय पथक सकाळपासून थांबुन आहेत. थोड्या वेळात स्टेबल न झाल्यास ICU मध्ये उपचार करण्याची आवश्यकता – जिल्हा शल्यचिकित्सकांनी वर्तवली आहे. प्रकृतीबाबत जिल्हा चिकित्सकांनी वरिष्ठांना दिली माहिती.
-
गडचिरोली – आरोग्य विभागाचे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे निलंबित
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागावर जबाबदारीत असक्षम, निष्काळजीपणा व दुर्लक्षपणा केल्याच्या ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेला आहे. आरोग्य मंत्रालयातून हा आदेश पारित करण्यात आला असून जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे यांच्या विरोधात अनेक तक्रार असताना आज तडका फडकीत आरोग्य मंत्रालयाने आज ही कारवाई केली. आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर टीव्ही 9 ने दाखवली होती बातमी टीव्ही 9 बातमीची दखल
-
रेशन दुकानातील ई केवायसी च्या आधारे 250 सिम कार्ड व बनावट बँक खात्यातून सायबर फ्रॉड…
नागरिकांनी आपली ई केवायसी पूर्ण केल्याशिवाय रेशन दुकानातील धान्य मिळणार नाही. असे सांगून माळशिरस तालुक्यातील नातेपुते परिसरातील काही ग्रामीण भागात बायोमेट्रिक आणि फेस रिडींग घेऊन बनावट सिमकार्ड विक्री करत बनावट बँक खाते तयार करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी ॲक्शन घेऊन कारवाई केली आहे. यामध्ये बायोमेट्रिक मशीन, लॅपटॉप यासह एक कार व सहा आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. तर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. तब्बल अडीचशे सिमकार्ड खरेदी करून या सिम कार्ड व बायोमेट्रिक च्या आधारे बनावट बँक खाते तयार करण्याचा प्रयत्न या टोळीकडून सुरू होता. याच टोळीचा पर्दाफाश आता पोलिसांकडून करण्यात आला आहे. या टोळीच्या माध्यमातून सायबर फ्रॉड करून अनेक मोठ्या रकमा देखील काढून घेण्याचा डाव असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे….
-
मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन म्हणजे नौटंकी- लक्ष्मण हाके
“ओबीसी आरक्षण संपलेलं आहे,” असं ठाम मत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार नाहीत. मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन म्हणजे नौटंकी आहे. मनोज जरांगे पाटील यांना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील लोकांनी मोठं केलं आहे, असं ते पुढे म्हणाले.
-
मनोज जरांगे यांच्या 12 मागण्या मान्य-गिरीश महाजन
मला वाटतं या संदर्भामध्ये कालच मुख्यमंत्री देवेंद्रजी, शिंदे साहेब त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. अनेक वेळेला जरांगे पाटलांबरोबर चर्चा झाली. अनेक वेळेला आमचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेलेत. जवळपास १३ मागण्या त्यांच्या होत्या, १२ मागण्या मान्य झालेल्या आहेत. आता जी मागणी मान्य करता येण्यासारखी नाही,त्याबाबतीतही ते आग्रह धरत असतील, तर ते सरकारलाही त्या ठिकाणी काही शक्य नाहीये.कारण सगळ्यांकडे आम्हाला बघावं लागतं, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
-
वाशिममध्ये पावसाने पाठ फिरवली, पिकांसोबत जलसाठ्याने चिंता वाढवली
वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने खरीप पिकांसोबतच जलसाठ्याचीही चिंता वाढली आहे. १६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७१२.८ मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ ४६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यावर झाला असून, २ मध्यम आणि ७५ लघु अशा ७७ प्रकल्पांमध्ये अवघा ४१.०२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता २९५.४५ दशलक्ष घनमीटर असून, सध्या केवळ १२१.१९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. आगामी रब्बी हंगामात काही प्रमाणात पेरा होण्याची शक्यता असली, तरी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच पाणीटंचाईचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य पाणी नियोजन आणि आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
-
मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक-आशिष शेलार
मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांच्या मागण्यावर सरकार, मंत्रिमंडळ चर्चा करत आहे. पण सणासुदीच्या काळात असे आंदोलन करणे योग्य नाही. फडणवीस आणि शिंदे यांनी आरक्षणासाठी अनेक निर्णय घेतले आहे, असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले. त्यांचे आंदोलन अतर्क्य आहे. अशी टोकाची भूमिका घेणे अतितायीपणा आहे असे शेलार म्हणाले.
-
उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर
शिवसेनेने एक सप्टेंबर पासून सरकारच्या विरोधात 17 दिवसाचं आंदोलन पुकारले आहे. उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आंदोलनात येत आहेत, अशी माहिती नेते अंबादास दानवे यांनी दिली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानल्या जात आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात आम्ही आंदोलन केले, आठवी जिल्ह्यात सरकारने जाहीर केलेले प्रकल्प फक्त कागदावर आहेत अशा ठिकाणी भेटी सुद्धा दिल्या. उजनीचे जे पाणी मराठवाड्यात येणार आहे तिथे जाऊन आलो, मुखेड तालुक्यात लेंडी प्रकल्पात जाऊन आलो. ईसापुर धरणावर जाऊन आलो, धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती पाहून आलो. लातूरला रेल्वे कोचची फॅक्टरी होणार होती तिथे जाऊन आलो, बीडला ऊसतोड कामगाराच्या मुलांसाठी कस्तुरबा गांधी वसतिगृह सुरू केले तिथे जाऊन आलो. कस्तुरबा गांधी वस्तीगृहात जाणारा म्हणून आदल्या दिवशी पहाट उशीर आणि मुल ही आदल्या दिवशी घेऊन आले. धाराशिवचे एम आर आय सेंटर सुद्धा सुरू नाही, असा पाढाच दानवे यांनी वाचला.
-
जरांगे पाटील यांना उपचारासाठी विनंती
मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ ICU मध्ये ॲडमीट करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय पथकाने नोंदवले आहे. जरांगे पाटलांकडुन कुठलीच प्रतिक्रिया येत नाही, प्रतिक्रिया जास्त खालावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सतीशकुमार सोळंके यांच्याकडून तपासणी केली जात आहे. महंत शिवाजी महाराज यांच्या विनंतीनंतर तपासणी केली जात आहे. शुगर बीपी कमी आहे डॉक्टरांनी हात जोडून विनंती केली उपचार घ्या.
-
बंजारा समाजाकडून आज जिंतूर शहर बंदची हाक
बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या विनोद आडे यांच्या समर्थनात परभणी शहरातून बंजारा समाजाचा मोर्चा निघाला. मोर्चात मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या. बंजारा आंदोलनकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
-
संजय उपाध्याय यांची जरांगे पाटील यांच्यावर टीका
मुंबई पोलीस आपलं काम करेल, मनोज जरांगे पाटील यांनी आपलं काम करावं. त्यांची जी भाषा आहे मुख्यमंत्र्यांबद्दल ती अलोकतांत्रिक आहे. आम्ही पण त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो पण आमची संस्कृती नाही, असे आमदार संजय उपाध्याय म्हणाले.
-
जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, बेडवरच विश्रांती
जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, बेडवरच विश्रांती घेत आहेत. दुपारी 1 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. वैद्यकीय पथकाकडून उपचार घेण्याची विनंती केली आहे. महंत शिवाजी महाराजांसह महाराज मंडळी जरांगे पाटलांच्या भेटीला आले आहेत. उपचार घ्यावेत अशी त्यांनी विनंती केली आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई प्रवासाचा आजचा आजचा दुसरा दिवस
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई प्रवासाचा आजचा आजचा दुसरा दिवस….बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाट्यावर मनोज जरांगे यांचं केलं जाणार जंगी स्वागत….भर रस्त्यात गावकऱ्यांनी काढली मराठा आरक्षणाची मोठी रांगोळी…क्रेनच्या माध्यमातून मोठा हार म्हणून जरांगे यांना घातला जाणार
-
भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात
भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात.अशोक खरातच्या वतीने राहुल कासलीवाल युक्तिवाद करणार तर सरकारी पक्षाच्या वतीने उज्वल निकम व्यक्तिवाद करणार. न्यायमूर्ती वाय एच अमेटा यांच्या समोर सुनावणी सुरू
-
निफाड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
निफाड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात…अर्धा एकर मिरची लागवडीसाठी ५० ते ६० हजारांचा खर्च…मिर्ची ला अपेक्षित ४० ते ५० रुपयांऐवजी मिळतोय केवळ १० ते २० रुपये किलोचा भाव…उत्पादन खर्च, मजुरी आणि वाहतूक खर्च भागवणेही कठीण…शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी…
-
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई प्रवासाचा आजचा दुसरा दिवस
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई प्रवासाचा आजचा दुसरा दिवस….मनोज जरागे पाटील यांच्यासोबत मुंबईला निघालेल्या मराठा बांधवांसाठी पाटोदा तालुक्यातील चुंबळी फाट्यावर चहा आणि नाश्त्याची व्यवस्था. मराठा बांधवांकडून मराठा आंदोलकांसाठी मसाले भाताच वाटप…
-
अमरावती-नागपूर महामार्गावर वाहनाला भीषण अपघात
अमरावती – नागपूर महामार्गावर जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला भीषण अपघात. अपघातात ९ गाईंचा मृत्यू ४ गाई जखमी. चिस्तुर शिवारामध्ये वाहनाचा टायर फुटल्याने पहाटेच्या सुमारास घडला अपघात. टायर फुटून वाहन उलटल्याने वाहनातील नऊ गाईंचा मृत्यू तर चार गाई जखमी. वाहन चालक आणि सहकारी अपघातात जखमी झाल्याची माहिती. तळेगाव पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले. जखमी गाईंना मंगलधाम गो संस्था अमरावती येथे दाखल करण्यात आले. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत
-
विरार वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार उत्साहात केले विसर्जन
विरार पश्चिमेकडील उमराले गावातील भूपेश पाटील यांच्या कुटुंबियांनी दीड दिवसाच्या गणरायाचे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार उत्साहात केले विसर्जन. वारकरी संप्रदायातील लहान सदस्यांच्या उपस्थितीत भजन, नृत्य, टाळ, मृदुग, वाजवत तसेच विविध पारंपरिक खेळ खेळत बाप्पाचे विसर्जन केले आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत भावुकता दिसून आली. भक्तिमय वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
-
अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली. नियमित कोर्ट रजेवर असल्यानं दुसऱ्या कोर्टात पार पडली सुनावणी. आता ३० सप्टेंबरला होणार भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर सुनावणी.
-
लालबाग परिसरात पहाटेपासून प्रचंड वाहतूक कोंडी
लालबाग परिसरात पहाटेपासून प्रचंड वाहतूक कोंडी.वाहनांच्या तब्बल दीड किलोमीटर लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. लालबागचा रस्ता गणेश दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने परळ ते भारत माता सिग्नल परिसरात वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल ४५ मिनिटे उशिराने सुरू. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबाग परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पुढील दहा दिवस नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळावा, तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असा सल्ला वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे लालबाग परिसरात येणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
गोंदियाच्या पाणीपुरवठा योजना 15 दिवसांपासून बंद
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील खांबी पाणीपुरवठा योजना 15 दिवसांपासून बंद…ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ… विज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद……
-
भंडाराच्या महिलांच्या गाडीला मध्यप्रदेशच्या सौसरजवळ अपघात
भंडारा जिल्ह्याच्या महिलांच्या गाडीला मध्यप्रदेशच्या सौसरजवळ अपघात; चालकाचा मृत्यू, ४ महिला जखमी. ऋषीपंचमीहून परतताना सौसरजवळील तीनखेडा येथे झायलो गाडीचा अपघात.
-
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा आज मुंबई दौरा
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा आज मुंबई दौरा. राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यावर नितीन नबीन सिद्धिविनायकच्या दर्शनाला दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते मंत्री यांची देखील उपस्थिती. सिद्धिविनायक नंतर नितीन नबीन लालबागच्या राजाचे घेणार दर्शन
-
जरांगे पाटलांच्या नियोजित दौऱ्यात बदल होण्याची शक्यता
जरांगे पाटलांच्या नियोजित दौऱ्यात बदल होण्याची शक्यता, पाटोद्यात हालचालींना वेग. खोपोली मार्गे थेट मुंबईत जाण्याची शक्यता. पाटोद्यात मोठा पोलीस बंदोबस्त तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडुन जरांगे पाटलांशी चर्चा करण्याचा प्रयत्न. प्रकृती खालावल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांसह वैद्यकीय पथकाकडून उपचार देण्यासाठी आणि तपासणीसाठी प्रयत्न सुरू, मात्र उपचार आणि तपासणीस जरांगे पाटलांचा नकार. मात्र अद्याप जरांगे पाटील बाहेर आले नसून कोणाचीही त्यांनी भेट घेतलेली नाही.
-
पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची तपासणी
पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची तपासणी. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून गाडीची तपासणी. मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने यायला निघाले आहेत.
-
भोंदू मनोहर भोसलेच्या सहकाऱ्याचा जामीन फेटाळला
सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेचा सहकारी आणि दत्तकला इन्स्टिटयूटचा प्रमुख रामदास झोळ याचा अटकपूर्व जामीन 2 ठिकाणाहून फेटाळला.तसेच रामदास झोळ हा भारत सोडून परदेशात जाऊ शकतो, त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला लुक आऊट नोटीस बजावली.
-
नाशिक महापालिकाची आज होणार महासभा
नाशिक महापालिकाची आज होणार महासभा. शहरातील सुरू असलेल्या कामांबाबत होणार चर्चा. सिंहस्ताचे काम तसेच इतर महत्त्वाच्या विषयांना दिली जाणार मान्यता.विरोधकांकडून शहरातील खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता.
-
हॉटेल व्यवसायिकाकडे मागितली तब्बल 3 लाख रुपयांची वर्गणी
सोलापुरातील एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांने हॉटेल व्यवसायिकाकडे मागितली तब्बल 3 लाख रुपयांची वर्गणी. वर्गणी मागणाऱ्या नेताजी शिंदे या कार्यकर्त्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल. वर्गणीची रक्कम ऐकताच हॉटेल व्यवसायिक एकनाथ घाडगे चक्रावले. मंडळाच्या सदस्यांसाठी पाचशे ड्रेसचे प्रत्येकी 600 रुपये याप्रमाणे 3 लाखांची मागणी करण्यात आली. मात्र हॉटेल चालक घाडगे यांनी यापूर्वी दोन लाख रुपये दिल्याचे सांगत प्रत्येक वर्षी 25 हजार रुपये वर्गणी देण्याची दर्शवली होती तयारी.
-
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस
काही वेळातच जरांगे पाटील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदाकडे रवाना होणार
मोर्चातील मराठा बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून 10 पेक्षा अधिक ट्रॅक्टर भरून हजारो पाणी बॉटलची व्यवस्था
मराठा बांधवांनी लोकवर्गणीमधून आणल्या पाण्याच्या बाटल्या
-
तुरीच्या उभ्या पिकावर शेतकऱ्याने फिरवला रोटर
मोठ्या अपेक्षेने पिकवलेली तूर डोळ्यादेखत उद्ध्वस्त करण्याची वेळ धुळे तालुक्यातील शेतकऱ्यावर आली आहे. देऊर खुर्द येथील शेतकरी देवेंद्रसिंग रामसिंग गिरासे यांनी तीन एकर क्षेत्रात तुरीची लागवड केली होती. मात्र, पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे तुरीचे पीक पूर्णपणे संकटात सापडले आहे. शेतकऱ्याने तुरीच्या उभ्या पिकावर रोटर फिरवला आहे.