थर्टीफर्स्टची नाईट तुमचीच… पहाटे किती वाजेपर्यंत सुरू राहणार बार आणि रेस्टॉरंट? वेळ घ्या जाणून

महाराष्ट्र गृह विभागाने नवीन वर्ष 2026 च्या सेलिब्रेशनसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 31 डिसेंबरला राज्यातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी कठोर अटी लागू केल्या आहेत, ज्यात खाजगी सुरक्षा रक्षक आणि ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. मुंबईत 17 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात असतील.

थर्टीफर्स्टची नाईट तुमचीच... पहाटे किती वाजेपर्यंत सुरू राहणार बार आणि रेस्टॉरंट? वेळ घ्या जाणून
31 डिसेंबरचं सेलिब्रेशन आता पहाटेपर्यंत करता येणार
| Updated on: Dec 31, 2025 | 11:29 AM

आज 31 डिसेंबर, बहुतांश जणांचे पार्टी आणि सेलिब्रेशनचे प्लान्स असतील, काहीजण घरी तर काही जण मात्र बाहेरच पार्टी करतील. पार्टी म्हटलं की बरेच जण मद्यप्राशनही करतात. हेच लक्षात ठेवून महाराष्ट्र गृह विभागाने एक महत्वाच निर्णय जाहीर केला आहे. गृह विभागाच्या जीआरनुसार, राज्यातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ऑर्केस्ट्रा बार नवीन वर्ष २०२६ साठी पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहण्याची परवानगी देण्यात आल्याचं वृत्त IANSने दिलं आहे.   वार्षिक परवानगी प्रक्रिया सुलभ करणे आणि वर्षअखेरीस सुट्टीच्या हंगामात वाढत्या मागणीला सामावून घेणे हा 30 डिसेंबरच्या या जीआरचा उद्देश आहे. त्यामुळे सेलिब्रेशन करणाऱ्यांसाठीआता बार नवीन वर्षाच्या पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार आहेत.

या ठरावानुसार, नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर रोजी कामकाजाच्या वेळेत शिथिलता लागू असेल.  या दिवशी, बार आणि रेस्टरंट्सना दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवण्याची परवानगी आहे, असे आयएएनएसने वृत्त दिले आहे. दरवर्षी विविध संस्थांकडून उशिरा येणाऱ्या अर्जांमुळे होणारा प्रशासकीय विलंब टाळण्यासाठी हा ठराव जारी करण्यात आल्याचेही सरकारने नमूद केलं आहे.

मात्र हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा वाढवण्यात आल्या असल्या तरी सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी राज्याने कठोर अटी लादल्या आहेत. सरकारी ठरावानुसार, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हॉटेल व बार मालकांनी त्यांच्या आवारात आणि बाहेर पुरेसे खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करावेत असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परिसरात किंवा आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही अनुचित घटना किंवा गुन्ह्यांची प्राथमिक जबाबदारी केवळ मालक/परवानाधारकाची असेल. वेळेची मुदतवाढ दिली असली तर सर्व हॉटेल किंवा रेस्टॉरंटसनी ध्वनी प्रदूषण कायदे आणि लाऊडस्पीकर आणि ध्वनी प्रणालींच्या वापराबाबत न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे, नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असेही निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच वेळेच्या वाढीची ही परवानगी फक्त इनडोअर किंवा बंद आस्थापनांनाच लागू आहे. खुल्या जागेतील ठिकाणे किंवा व्यवसायांना ही मुदतवाढ दिलेली नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. या वाढीव वेळेत सार्वजनिक शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहेत.

कडक पोलीस बंदोबस्त तैनात

दरम्यान, नवीन वर्ष 2026 च्या सेलिब्रेशनमदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून त्याचाच भाग म्हणून मुंबई पोलिसांनी 17 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, वांद्रे बँडस्टँड, जुहू आणि वर्सोवा समुद्रकिनाऱा अशा शहरातील प्रमुख ठिकाणी बुधवार संध्याकाळपासून मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. तसेच विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मॉल्समध्ये होणारे सेलिब्रेशनही गरूवारी पहाटेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर, शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. महत्त्वाच्या ठिकाणी, महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी (पोलिस चौक्या) उभारल्या जातील आणि रस्त्यांवर गस्त वाढवली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.