दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, अचानक भेटीचा तपशील आला समोर; काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, पक्षाच्या भविष्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बड्या नेत्याने चक्क शरद पवार यांची भेट घेतली आहे. सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची बैठक झाल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने शरद पवारांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या भेटीचा फोटोही समोर आला आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याचे पहायला मिळत आहे. त्यासंदर्भातील फोटोही समोर आलेले आहेत. या भेटीत नेमकं काय झालं, कशावर चर्चा झाली याचा तपशील समोर आला आहे.
कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा ?
या दोन्ही नेत्यांची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. कांद्याच्या दराचा प्रश्न असेल किंवा राज्यातील सहकार विभागाच्या अनेक विषयांबद्दलच्या चर्चा, या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचे समजते. मात्र शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची ही भेट राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे.
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रीकरणाचे विषय सातत्याने समोर येताना दिसत आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यातच आता राष्ट्रवादीचे आणखी एक नेते, दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली, हे महत्वाचं मानलं जात आहे.
शरद पवार अध्यक्ष असलेल्या अनेक संस्थामध्ये दिलीप वळसे पाटील हे अजूनही सक्रीय सदस्य असल्याचे पहायला मिळते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट असो किंवा वाय.बी.चव्हाण सेंटर असेल, यामध्ये दिलीप वळसे पाटील अजूनही सक्रीय सदस्य आहेत. अनेक संस्थांमधील अनेक जबाबदाऱ्या अजूनही त्यांच्याकडे असल्याचे पहायला मिळते.
वळसे पाटील यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण
त्यातच आज त्यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली, त्याला एक राजकीय अँगलही मिळाल्याचे दिसत आहे. मात्र ही भेट कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीवर झालेली नाही, असं दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. या भेटीमागे सामाजिक आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली, असं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने काय सांगितलं ?
दिलीप वळसे पाटील हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांच्यासोबत सर्व ज्येष्ठ नेत्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे पवार साहेबांना भेटले असतील तर त्यात गैर समजण्याचं काही कारण नाही, ते काही पहिल्यांदा त्यांना भेटलेले नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितलं.
ज्यावेळी अजित पवारांसोबत अनेक ज्येष्ठ नेते आणि अनेक आमदार बाहेर पडून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला, त्यानंतरच्या काळातही आमच्या पक्षाचे अनेक नेते पवार साहेबांना भेटले होते. कधी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी, तर कधी एखाद्या समारंभाच्या निमित्ताने त्यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली. अजित दादा आणि शरद पवार साहेब सुद्धा अनेकदा एका व्यासपीठावर आले होते . त्यामुळे या भेटीला वेगळं वळण देण्यासारखं काही नाही, असं पाटील म्हणाले.