शरद पवारांचा राष्ट्रवादीसोबत युती करण्याला पूर्णविराम, अजितदादा म्हणाले प्रत्येकाला…

शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील युतीच्या चर्चांना स्पष्टपणे नकार दिला. त्यांनी संधीसाधू राजकारणाचा निषेध केला आणि गांधी-नेहरू तसेच फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून राजकारण करण्याचा आग्रह धरला.

शरद पवारांचा राष्ट्रवादीसोबत युती करण्याला पूर्णविराम, अजितदादा म्हणाले प्रत्येकाला...
sharad pawar ajit pawar
| Updated on: Jun 17, 2025 | 2:59 PM

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. संधीसाधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यावर आता अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चांवर स्पष्ट वक्तव्य केले. “अनेक लोक वेगळ्या विचाराचे आहेत. कुणी तरी आता म्हणालं सर्वांना बरोबर घ्या. सर्वांना बरोबर घ्यायला हरकत नाही. पण सर्व म्हणजे कोण? गांधी, नेहरू यांचा विचार आणि फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार मानत असेल तर त्यांनासोबत घेणं मान्य आहे. पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कुणाशीही संबंध ठेवा. पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असूच शकत नाही. त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहीत करायचं नाही. त्यादृष्टीने पावलं टाकायचं आहे. आम्ही संधीसाधूंसोबत जाणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.

कोण गेला त्याची चिंता करू नका – शरद पवार

“काही लोक गेले. नवीन काही लोक येत आहे. गेले त्यांची चिंता करू नका. अनेक लोक येत आहेत. कोण आला, कोण गेला त्याची चिंता करू नका. लोक शहाणे आहेत. या देशाची लोकशाही नेत्यांमुळे टिकली नाही. सामान्य लोकांच्या सामुदायिक शहाणपण आणि एकीतून लोकशाही टिकली आहे. त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणपण याचा सन्मान करणं आणि त्यासोबत उभं राहण्याचं काम करावं लागेल”, असेही शरद पवारांनी म्हटले.

अजित पवार काय म्हणाले?

आता यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास शरद पवारांनी विरोध केल्यानंतर अजित पवारांनी भाष्य केले. “प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार” असे अजित पवारांनी म्हटले. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं एकीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.