8 जुलैपासून पाऊस वाढणार की घटणार? पुढील 10 दिवसांचा अंदाज आला, मुख्यमंत्री कार्यालयाने दिली सर्वात मोठी अपडेट

CMO Maharashtra Rain Update : आता पुढील काही दिवस पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

8 जुलैपासून पाऊस वाढणार की घटणार? पुढील 10 दिवसांचा अंदाज आला, मुख्यमंत्री कार्यालयाने दिली सर्वात मोठी अपडेट
maharashtra rain forecast
Image Credit source: Google
| Updated on: Jul 07, 2026 | 5:49 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी रहिवासी भागात पाणी घुसल्याचेही समोर आले आहे. काही भागात शेतमालाचेही मोठे नुकसान झाले आहे. आजही राज्यातील अनेक भागांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आता पुढील काही दिवस पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे व नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.

पुढील 10 दिवस पावसाच्या प्रमाणात घट होणार

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते.

पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे अशी सोशल मीडिया पोस्ट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तसेच काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता पुढील 10 दिवस पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Follow Us