Maharashtra Weather : नवरात्रीतही पावसाचा कहर, राज्यासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे; मुंबई, पुण्यासह 36 जिल्ह्यांना अलर्ट काय?

महाराष्ट्रात ऐन नवरात्रीत जोरदार पावसाचा कहर सुरू आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने २४ तासांसाठी अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Weather : नवरात्रीतही पावसाचा कहर, राज्यासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे; मुंबई, पुण्यासह 36 जिल्ह्यांना अलर्ट काय?
| Updated on: Sep 23, 2025 | 9:12 AM

ऐन नवरात्रीत राज्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी राज्यात अलर्ट जारी केला आहे. आज २३ सप्टेंबर रोजी राज्यातील 31 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येऊ शकतो. तसेच राज्यातील उर्वरित ३१ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई, कोकणात जोरदार पाऊस

सध्या मुंबईत ढगाळ वातावरण आहे. आज दिवसभर मुंबईत आकाश थोडे ढगाळ राहील. काही ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर विशेषत: रायगड आणि रत्नागिरीत मध्यम ते जोरदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस येऊ शकतो.

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात काय  स्थिती?

त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यासोबतच धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.