
मुंबईसह महाराष्ट्रात संततधार पाऊस सुरु आहे. त्यातच काल महाराष्ट्रात दोन मोठ्या आणि दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमाळा पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. कुंडमाळा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 51 जण जखमी झाले आहेत. तर, दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात बुडून पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पुण्याच्या मावळमधील कुंडमाळा येथे पूल कोसळला. हा पूल कोसळल्यानंतर काल रविवारी रात्री १० वाजता बचावकार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी ७ वाजता पुन्हा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र, मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, ५१ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल दुपारपासून रात्री १० वाजेपर्यंत (सुमारे साडेसहा तास) चाललेल्या बचावकार्यात ४ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते.
मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणताही पर्यटक बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही, तरीही खबरदारी म्हणून आज सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मावळचे प्रांत सुरेंद्र नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाला समांतर असा नवीन पूल बांधण्यासाठी १० जून रोजीच वर्क ऑर्डर निघाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील बासर येथील गोदावरी नदीपात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे सर्व भाविक हैदराबाद येथून बासर येथील देवीच्या दर्शनासाठी आले होते. होडीने नदीपात्रात गेल्यानंतर बेटावरून उतरून स्नान करत असताना ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.