कुठे बस उलटली, तर कुठे दुचाकीला धडक; राज्यातील अपघातांचे सत्र थांबता थांबेना, मृतांचा आकडा…

महाराष्ट्रातील लातूर, बीड आणि अमरावती येथे गेल्या २४ तासांत झालेल्या तीन भीषण रस्ते अपघातांची माहिती. ५ जणांचा मृत्यू आणि २८ जखमी प्रवाशांची सद्यस्थिती. मद्यधुंद चालक आणि बसला लागलेली आग यांमुळे राज्यावर पसरलेली शोककळा, वाचा सविस्तर वृत्त.

कुठे बस उलटली, तर कुठे दुचाकीला धडक; राज्यातील अपघातांचे सत्र थांबता थांबेना, मृतांचा आकडा...
maharashtra accident
| Updated on: Mar 16, 2026 | 11:45 AM

राज्यात सध्या अपघातांचे सत्र सातत्याने सुरु आहे. त्यातच गेल्या २४ तासांत राज्यात रस्ते अपघातांच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. लातूर, बीड आणि अमरावती येथे झालेल्या या अपघातांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. यामध्ये एकूण ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर २८ प्रवासी जखमी झाले आहेत.

लातूर जिल्ह्यातील रेतू उमरगा येथे एका भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या दुर्दैवी घटनेत रेतू उमरगा गावचे उपसरपंच अंकुश गीते (वय ५०) आणि त्यांचा मुलगा ओंकार गीते या दोघांचा मृत्यू झाला. हे पिता-पुत्र शेतातील काम आटोपून मोटारसायकलने घराकडे निघाले होते. त्याच वेळी मागून आलेल्या सुसाट कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही इतकी जोरदार होती की धडक दिल्यानंतर कारही रस्त्यावर उलटली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

तर दुसरीकडे बीड-अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी फाटा येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास एक खासगी ट्रॅव्हल्स उलटून भीषण अपघात झाला. या अपघातानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. या आगीत प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप, कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. या घटनेत २८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने केज आणि अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि तीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुदैवाने, आग पूर्णपणे भडकण्यापूर्वी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.

अमरावतीत वडील-मुलीचा जागीच अंत

तसेच अमरावती येथील जुना बायपास रोडवर आनंद मार्बल फॅक्टरीसमोर एका भरधाव कारने दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात गजानन श्रीराम माकोडे (५५) आणि त्यांची मुलगी सपना माकोडे (२४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी प्रियंका माकोडे (२३) ही गंभीर जखमी आहे. तिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील तिघेही ५० ते ६० फूट दूर फेकले गेले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कारमधील तरुण दारूच्या नशेत होते. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Follow Us