
Maharashtra Samruddhi Mahamarg: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला ‘समृद्धी महामार्ग’ पूर्ण क्षमतेने खुला होण्याच्या उंबरठ्यावर आहे. समृद्धी महामार्गाचा ६२५ किलोमीटरचा टप्पा सध्या सुरु आहे. इगतपुरी- आमने भिवंडी ७६ किलोमीटरचा टप्पा मे महिन्यात खुला होणार आहे. यामुळे नाशिक-मुंबई प्रवास अवघ्या अडीच तासांत होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला होण्याच्या उंबरठ्यावर आहे. एक मे महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्ग खुला होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी या महामार्गाचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकणमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंज दरम्यान एकूण ८० किमी लांबीच्या मार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे लोकार्पण केले होते. त्यानंतर ४ मार्च २०२४ रोजी समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरजचेंज इगतपुरीपर्यंतच्या २५ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले. आता शेवटच्या आणि चौथ्या टप्पाचे लोकार्पण होणार आहे. यामुळे नागपूर ते मुंबई हा १५ तासांचा प्रवास केवळ ७ तासांत होणार आहे.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरु झाल्यावर नाशिकहून मुंबई अवघ्या अडीच तासांत गाठता येणार आहे. इगतपुरी ते आमणे हा ७६ किमी लांबीचा हा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये पाच बोगदे आहेत. या बोगद्यांची एकूण लांबी ११ किमी आहे. त्यातील ७.८ किमी लांबीचा एक बोगदा आहे. हा बोगदा देशातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा आहे. या बोगद्यामुळे केवळ आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा प्रवास होणार आहे.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबई प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच इंधनाची बचत होणार आहे. महाराष्ट्रातील पश्चिमेकडील जिल्ह्यांसाठी हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे.