
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (MSBSHSE) इयत्ता 10 वीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत ही परीक्षा पार पडणार आहे. राज्यातील एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये 8 लाख 65 हजार 750 मुलं, 7 लाख 42 हजार 736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर , ही 10वीची परीक्षा देणार आहेत. राज्यात9 हजार 788 दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे
महाराष्ट्रातील एकूण 5 हजार 111 मुख्य केंद्रां वर ही परीक्षा पार पडणार आहे. राज्यातील, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, अशा 9 विभागांतून ही परीक्षा होत आहे.
विद्यार्थ्यांवर कडक नजर, 271 भरारी पथकांचा वॉच
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने दहावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी कडक वॉच ठेवण्यात येत आहे. कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी 271 भरारी व बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील 191 परीक्षा केंद्रं ही संवेदनशील असून, त्यापैकी 42 ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने शिक्षक-कर्मचाऱ्यांची अदलाबदल होणार आहे. तर 554 केंद्रांवर अद्याप कॅमेरे बसवलेले नाहीत. मागील वर्षी 31 केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती.
परीक्षाकेंद्रापासून 500 परिसरातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर पुण्यातील दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉप वापराची मुभा देण्यात आली आहे.
दहावीची पहिली परीक्षा सक्तीची; न दिल्यास दुसरी संधी नाही
Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र असं असलं तरीही ही पहिली परीक्षा देणे सक्तीचे केले आहे. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल. या नियमात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे.