वीर सावरकर यांच्या बॅरिस्टर डिग्रीबाबत फडणवीसांचा महत्त्वपूर्ण निर्णय

वीर सावरकर यांच्यावर पुस्तक लिहिणारे प्राध्यापक चिरायू पंडित यांनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं त्यांनी म्हटलंय. चिरायू पंडित यांनी उदय माहूरकर यांच्यासोबत 'वीर सावरकर- द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन' हे पुस्तक लिहिलंय.

वीर सावरकर यांच्या बॅरिस्टर डिग्रीबाबत फडणवीसांचा महत्त्वपूर्ण निर्णय
Veer Savarkar and Devendra Fadnavis
Image Credit source: Instagram
| Updated on: May 28, 2025 | 11:47 AM

स्वातंत्रसैनिक वीर सावरकर यांच्या ‘बीए’ आणि ‘बॅरिस्टर’ पदव्या ब्रिटिशांनी काढून घेतल्या होत्या. यापैकी ‘बीए’ पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली होती. आता महाराष्ट्र सरकारने जाहीर केलंय की वीर सावरकर यांची बॅरिस्टर पदवी पुन्हा बहाल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितलं की, “आम्ही ती पदवी परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर ही पदवी देऊ.” मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्रच्या उद्घाटन समारंभात फडणवीसांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार होते. परंतु काही कारणांमुळे हे हजर राहू शकले नव्हते.

या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, “या नवीन संशोधन केंद्रामुळे वीर सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्याच्या कामात मदत होईल. यासंदर्भात प्रस्ताव आणि कागदपत्रे सादर केली जावीत. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ज्या कार्यालयात बसतात, त्या कार्यालयात त्यांच्या खुर्चीच्या मागे फक्त दोनच फोटो आहेत. एक आर्य चाणक्य आणि दुसरं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं. त्यामुळे सावरकरांप्रती असलेली त्यांची भक्ती शब्दांत व्यक्त करण्याची गरज नाही. सावरकरांचं संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी आहे. बालपणी अभिनव भारतसारखी संघटना स्थापन करून त्यांनी भारतीय स्वातंत्र्याबद्दल जागरूकता निर्माण केली. लंडनमधील इंडिया हाऊसच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं.”

“ब्रिटिश पत्रात सर्वांत खतरनाक क्रांतिकारक म्हणून वीर सावरकर यांचा उल्लेख केला होता. याच भीतीपोटी त्यांच्या पदव्या काढून घेण्यात आल्या होत्या. जर सावरकरांना मार्सिले बंदरात अटक झाली नसती तर भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगळा असता. ते एकमेव स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा झाली. पण काही मूर्ख त्यांना माफी वीर म्हणतात. माझं त्यांना एकच आवाहन आहे की तुम्ही अंदमानच्या कोठडीत फक्त 11 तास घालवा, मग मी तुम्हाला पद्मश्री देण्याची शिफारस करेन”, असं थेट आव्हान फडणवीसांनी दिलं.

वीर सावरकर यांनी लंडनमधील ग्रेज इथं बार-ॲट-लॉची परीक्षा उत्तीर्ण केली होती. ते ग्रेज इन लॉ कॉलेजचे विद्यार्थीदेखील होते. जरी ते परीक्षा उत्तीर्ण झाले असले तरी त्यांच्या राजकीय कारवायांमुळे त्यांना बारमध्ये प्रवेश मिळाला नव्हता.