महाविकास आघाडीच्या मराठवाड्यातील पहिल्या सभेत नारीशक्ती दिसणार, टार्गेटही ठरलं, तिन्ही पक्ष लागले कामाला; प्लॅनिंग काय?

| Updated on: Mar 24, 2023 | 10:29 AM

शिंदे-फडणवीस सरकारसमोर महाविकास आघाडीची ताकद दाखण्यासाठी राज्यभरात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेच्या संयुक्त सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील पहिल्या सभेत नाऱीशक्तीवर विशेष भर देण्यात आलाय.

महाविकास आघाडीच्या मराठवाड्यातील पहिल्या सभेत नारीशक्ती दिसणार, टार्गेटही ठरलं, तिन्ही पक्ष लागले कामाला; प्लॅनिंग काय?
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: social media
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : भाजप-शिंदे समर्थित शिवसेना युतीला आगामी निवडणुकांमध्ये कडवी झुंज देण्यासाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) वज्रमूठ आवळली आहे. लोकसभा (Loksabha) आणि विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी एकजुटीने निवडणुकांना सामोरं जाण्याचं ठरवलंय. महाविकास आघाडीची एकजूट जनतेच्या मनावर बिंबवण्यासाठी महाराष्ट्रात संयुक्त सभांचं मोठं प्लॅनिंग करण्यात आलंय. विशेष म्हणजे शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या संभाजीनगरातून या सभांची सुरुवात होतेय. मराठवड्याचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या संभाजीनगरात २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सभेत नारीशक्ती एकवटण्यावर जास्त भर दिला जाणार आहे.

बिग टार्गेट, नारीशक्ती एकटवणार

शिंदे फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारने दंड थोपटले आहेत. संभाजीनगरात होणाऱ्या सभेत गर्दी जमवण्यासाठी तिन्ही पक्षांना विशेष टार्गेट देण्यात आलंय. विशेष म्हणजे या सभेत नारीशक्तीचं दर्शन घडलं पाहिजे, अशी रणनीती आखण्यात आली आहे. सभेत ठाकरे गटाने १५ हजार, राष्ट्रवादीने ५ हजार तर काँग्रेसने १० हजार महिला जमा करायच्या आहेत, असं ठरल्याचं सांगितलं जातंय. सभेतील एकूण गर्दीमध्ये जवळपास ३० हजार महिला असतील, असं ठरवण्यात आलंय. तर संपूर्ण सभामंडपात ५० टक्के महिला दिसतील, असं प्लॅनिंग सुरु आहे.

कुठे होणार सभा?

संभाजीनगरातील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर येत्या २ एप्रिल रोजी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या पूर्वतयारीसाठीची महिला आघाडी एक बैठक नुकतीच क्रांती चौक येथील मातृभूमी प्रतिष्ठान येथे पार पडली. या बैठकीला शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष हेमा पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष छाया जंगले उपस्थित होत्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांच्यावर या संयुक्त सभेची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते जमवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते कामाला लागले आहेत.

राज्यात कुठे कुठे सभा?

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने रणशिंग फुंकलं आहे. सरकारला आपली ताकद दाखवण्यासाठी येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. संभाजीनगरात २ एप्रिल रोजी सभा होतेय. तर दुसरी सभा नागपूरात १६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. मुंबई महाराष्ट्र दिनाला १ मे रोजी मविआची तोफ धडाडेल. तर १४ मे रोजी रविवारी पुण्यात महासभेचं आयोजन करण्यात आलंय. २८ मे रोजी रविवारी कोल्हापुरात मविआची संयुक्त सभा होईल. ३ जून रोजी नाशिक तर ६ जून रोजी अमरावतीत महाविकास आघाडीच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय.