महायुतीत बिनसलं? शंभुराज देसाई यांचा थेट भाजपला इशारा; म्हणाले, आम्हाला विचार करावा लागेल

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत, विशेषतः भाजप आणि शिंदे गटात, बिनसल्याचं दिसत आहे. भाजपने स्वबळाची भाषा वापरल्याने शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. "आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल," असे म्हणत देसाईंनी समन्वय बैठकीला भाजपमंत्र्यांनी प्रतिसाद न दिल्याची खदखद व्यक्त केली.

महायुतीत बिनसलं? शंभुराज देसाई यांचा थेट भाजपला इशारा; म्हणाले, आम्हाला विचार करावा लागेल
शंभुराज देसाई यांचा भाजपला इशारा
| Updated on: Jun 15, 2026 | 1:12 PM

सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिंदे गटात बिनसल्याचं दिसत आहे. भाजपकडून या निवडणुकीत स्वबळाची भाषा करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असं सांगतानाच नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी तुम्ही प्रतिसाद दिला का? आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, असा कडक इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपला सज्जड इशारा दिला आहे. सांगली- सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप त्यांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना एकत्र पर्यटनासाठी नेणार आहे. मी त्याची माहिती घेतली नाही. आमची कोअर कमिटीची बैठक काल झाली. त्याप्रमाणे उद्या आमच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत जे होईल ते वरिष्ठांना सांगितलं जाईल आणि त्यानंतर मुंबईत याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असं शंभुराज देसाई म्हणाले.

वेगळा विचार करावा…

सदस्यांचा मत काय आहे हे समजून घेतलं तरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावर पुढचे धोरण ठरवतील, अशी माहितीही शंभूराज देसाई यांनी दिली. कराडमध्ये झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला शंभूराजे देसाई उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता, पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री समन्वय करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही येत नाही आणि समन्वय बैठकीच्या वेळीच तुम्ही जाहीर करता भाजप स्वबळावर लढेल. तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हाला ही विचार करावा लागणार आहे, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला. देसाई यांनी मनातील खदखद व्यक्त करत आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, असा सूचक इशाराही दिला आहे.

राष्ट्रवादीचीही दांडी

दरम्यान, 13 तारखेला कराडमध्ये सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीकडे शिंदे गट आणि राष्ट्रवादीने पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराडमध्ये भारतीय जनता पार्टीने बोलावलेल्या बैठकीला उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. या महायुतीच्या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील उपस्थित नव्हते. तर राष्ट्रवादीनेही बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीत अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

 

 

Follow Us