
बारामती तालुक्यात एक भीषण अपघात झाला असून त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पालखी महामार्गावर लिमटेक ते बारामती दरम्यान एका कारचे टायर फुटून भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाला. आदित्य निंबाळकर(वय २३) असे मृत तरूणाचे नाव असून तो इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा मुलगा आहे. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावरील रुई लीमटेक या मार्गावर मंगळवारी दुपारी कारचा अपघात झाला. हा अपघात इता भयानक होता की संपूर्ण गाडीचा चक्काचूर झाला. त्यामध्ये तरण्याताठ्या मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघातवेळी तेथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य निंबाळकर हा काटेवाडीहून रुई मार्गे बारामतीकडे निघाला होता. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रूईपाटी जवळ आल्यानंतर अचानक त्याच्या कारचा टायर फुटला आणि त्यामुळे कार पलटी झाली. आणि महामार्गावरून घसरत जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका इमारतीवर जाऊन आदळली. या अपघातात आदित्य निंबाळकर गंभीर जखमी झाला, त्याला उपचारांसाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे उपचारांदरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की कारचाही चक्काचूर झाला आहे.
आदित्यच्या अशा अकस्मात मृत्यूमुळे निंबाळकर कुटुबियांवर शोककळा पसरली आहे. तर संपूर्ण बारामतीतही या घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान लिमटेक ते बारामती दरम्यान पालखी मार्गाचे काम झाल्यामुळे या मार्गावरून चार चाकी दुचाकी गाड्या भरधाव वेगाने जातात. या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांनी वेगाला मर्यादा पाळण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त होत आहे.