
चंद्रपूर जिल्ह्यात अनेकदा वाघाने नागरिकांवर किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या बातम्या तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. आताही जिल्ह्यात वाघांची दहशत कायम आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मूल तालुक्यातील सोमनाथ भागातून एक दुःखद घटना समोर आली आहे. या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात 52 वर्षीय अन्नपूर्णा तुलसीराम बिलोने यांचा मृत्यू झाला आहे. समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रकल्पाच्या निवासी संकुलात ही घटना घडली आहे.
या घटनेबाबत माहिती देताना रेंज फॉरेस्ट ऑफिसर रामचंद्र शेंडे यांनी सांगितले की, सकाळी 5 वाजता अन्नपूर्णा आणि तिचे पती तुलसीराम हे दररोजच्या कामात व्यस्त होते. त्यावेळी अचानक झुडपातून एक वाघ बाहेर आला आणि त्याने अन्नपूर्णा यांच्यावर हल्ला केला. यावेळी पत्नीला वाचवण्यासाठी तुलसीराम हे वाघाशी भिडले. हातात काठी घेऊन त्यांनी वाघावर हल्ला केला, मात्र पत्नीला वाघाच्या जबड्यातून सोडवण्यात त्यांना अपयश आले. तोपर्यंत आजूबाजूचे लोक जमा झाले. गर्दी जमल्यानंतर वाघ अन्नपूर्णा यांना सोडून जंगलाकडे पळाला, मात्र तोपर्यंत अन्नपूर्णा यांचा मृत्यू झाला होता.
वन विभागाने मृत अन्नपूर्णा यांच्या कुटुंबाला 20 हजार रुपयांची सुरुवातीची मदत दिली आहे. रेंज फॉरेस्ट ऑफिसर रामचंद्र शेंडे यांनी म्हटले की, ‘या घटनेनंतर परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे, कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले आहेत. तसेच लोकांना सतर्क करण्यासाठी घोषणा दिल्या जात आहेत. या वाघाला पकडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. त्यानंतर वाघाला पकडले जाईल.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेल्याची ही पहिली घटना नाही. याआधी 4 सप्टेंबर रोजी पाथरी गावात शेतात काम करणाऱ्या 7 वर्षीय पांडुरंग भिकाजी चाचणे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने कारवाई करत 7 सप्टेंबर रोजी हल्ला करणाऱ्या वाघिणीला शांत करून पिंजऱ्यात बंद केले होते.