Manoj Jarange Patil : जरांगेंनी ऑडिओ क्लीप बाहेर काढताच घडामोडी वाढल्या, शिंदे गटाचे शिष्टमंडळ थेट फडणवीसांच्या भेटीला!
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लीप समोर आल्यानंतर या क्लीपमधील आवाज भाजपाच्या नेत्यांचा आहे, असा दावा शिंदे गटातर्फे करण्यात आलाय. दुसरीकडे या ऑडिओ क्लीपशी भाजपाच्या नेत्यांचा काहीच संबंध नाही, असे भाजपाने स्पष्ट केलेय.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी टाकलेल्या ऑडिओ क्लीप बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात केलेल्या 500 कोटींच्या आरोपांचे पुरावे म्हणून त्यांनी या ऑडिओ क्लीप समोर आणल्या आहेत. या ऑडिओ क्लीपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आहे. तसेच 500 कोटी रुपये आणि जरांगे यांना कसे बदनाम करायचे, याची चर्चा सुरू असल्याचे दिसते. दरम्यान, या ऑडिओ क्लीप्स समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महत्त्वाचे आणि बडे नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत.
शिंदे यांचे मंत्रिमंडळ फडणवीसांच्या भेटीला
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लीप समोर आल्यानंतर या क्लीपमधील आवाज भाजपाच्या नेत्यांचा आहे, असा दावा शिंदे गटातर्फे करण्यात आलाय. दुसरीकडे या ऑडिओ क्लीपशी भाजपाच्या नेत्यांचा काहीच संबंध नाही, असे भाजपाने स्पष्ट केलेय. तसेच या ऑडिओ क्लीपची सखोल चौकशी करायला हवी, अशी मागणी भाजपा, शिंदे गटाने केलीय. दरम्यान एकीकडे ही ऑडिओ क्लीप समोर येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेटीला पोहोचले आहेत. शिंदे गटाच्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. राहुल शेवाळे, मिलिंद देवरा, सचिन अहीर अशी शिष्टमंडळातील शिंदे गटाच्या नेत्यांची नावे आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करावी, अशी मागणी या शिष्टमंडळातर्फे केली जाणार आहे. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांना दिले जाणार आहे. दरम्यान, आता जरांगे यांच्या कथित ऑडिओ क्लीपची तपासणी करण्याचा आदेश दिल्यानंतर त्यातील आवाज नेमका कोणाचा आहे, हे स्पष्ट होणार आहे. त्याआधी आजकालच्या एआयच्या जमान्यात कृत्रिम आवाज तयार केलेले असावेत, असा दावा भाजपाच्या काही नेत्यांनी केलाय. त्यामुळे पुढच्या काही दिवसात नेमकं काय काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.