मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली, आता पुढे काय? मनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकला
मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. त्यांनी न्यायदेवतेचा अपमान केल्याचे जरांगेंनी म्हटलं.

Manoj Jarange Mumbai Agitation: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतरही मुंबईत जाऊन आंदोलन करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यांनी न्यायदेवतेचा अपमान केल्याचेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टात जाणार असल्याचेही संकेत दिले आहेत.तसेच आजपासून सलाइन घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे पाटील यांना मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. आझाद मैदानावर आंदोलनासाठी गंगाधर काळकुटे यांच्या नावाने पत्र पोलीस स्टेशनला देण्यात आलं होतं. परंतु नियम मोडलाच नाही, मग आधीच कशी परवानगी नाकारली, गेल्यावर्षी परवानगी दिली, यंदा कशी नाकारली, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारताना आझाद मैदान पोलिसांनी गेल्या वर्षी अटी शर्तीचा भंग केल्याचा दाखला दिल्याची माहिती मिळत आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘आम्ही मुंबईत शांततेत जाणार. तुम्ही मनमानी करणार, आम्ही थांबणार नाही. त्यांना न्यायदेवतेचं देणेघेणं नाही. कसले दाखले देणार, आम्ही थांबणार नाही. मागच्या वर्षी परवानगी मिळाली होती. या वर्षी कशी नाकारण्यात आली. सरकारच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे का? मराठ्यावर अन्याय करणे, न्यायालयावर अन्याय करणे, संविधानावर अन्याय करणे यास सरकार म्हणतात का? गेल्या वर्षी हेच सरकार होतं, हेच गृहमंत्री होते. यंदा सहानी खटला कसा आला, गेल्या वर्षी का आला नाही. यांना कायद्याचं देणेघेणं नाही. सरकारकडून अपमान आहे. सरळ सरळ न्यायदेवतेचा अपमान आहे.
‘आम्ही न्यायदेवतेच्या बाजूने आहे. न्यायदेवतेने म्हटलं की, अटी शर्ती घातल्यानंतर आंदोलन रोखू शकत नाही. सरकार न्यायदेवतेचं ऐकत नाही. परवानगी देणारे ते आहेत. आम्ही कायद्याला मानतो. त्यासाठी अर्ज केला. पुर्नविचार करून परवानगी त्यांना द्यावी लागणार आहे. नियम भंग करण्याआधीच असं बोलू लागले आहेत. सरकारकडून शासकीय सुट्टी असलेल्या शनिवारी आणि रविवारी देखील चौकशी होते. काय अस्थिरता आहे. स्थिर सरकार ठेवायचं का नाही. कोणतं हिंदूत्व? या प्रकरणात आमचे वकील बांधव बघतील. आम्ही मुंबईला जाणार. आमचे वकील बांधवाची टीम बघेल. कुठे आता प्रश्न मांडायचा, हे वकील टीम बघेल. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार, ते करणारच. कोणालाही रोखता येणार नाही. गोळ्या घालण्याचं षडयंत्र आहे का? राज्य अस्थिर केलं जात आहे, त्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील’, असेही त्यांनी पुढे सांगितले.