त्या नेभळ्या भोऱ्याला काय कळणार? मनोज जरांगे पाटील भाजपच्या बड्या नेत्यावर भडकले, सगळंच काढलं
कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आपल्या दौऱ्याबद्दल माहिती देताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जात आहोत, मात्र सरकारचा सगळ्यात मोठा प्लॅन हा आहे की कोल्हापूर आणि सातारा संस्थानचं गॅझेट द्यायचं नाही. मी जबाबदारीने सांगतो हा पूर्ण नियोजित कट आहे, काहीही झालं तरी सरकारला सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थांचा जीआर द्यायचा नाही.कारण कोल्हापूर संस्थान मध्ये 3 लाख 85 हजार कुणबी आहेत. हे गॅझेट त्यांना लागू करायची नाही म्हणून त्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द व्हायला लागलेत. असा एक समाजाच्या बदनामीचा घाट घातला आहे, हा नवीन कट रचलेला आहे, असा आरोप यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, सातारा संस्थानचे गॅजेट आणि 58 लाख नोंदी यांना द्यायच्या नाहीत, यासाठी यांनी नियोजित कट रचलेला आहे, मात्र मी यांच्या मुडक्यावर पाय देऊन नोंदी घेणार आहे. त्यामुळे सगळ्या मराठा समाज बांधवांशी गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहे. पश्चिम महाराष्ट्र नंतर मराठवाडा विदर्भामध्येही जाणार आहे. आता मी त्यांना सोडणार नाही,मी यांची मस्ती पूर्णपणे जिरवून टाकणार आहे, गरीब मराठा समाजातील लेकरांचा वाटोळं करण्याचं काम सध्या सुरू आहे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. अक्कल असणाऱ्या लोकांनी पक्षांमध्ये गेल्यावर अक्कल गहाण ठेवलेली असते, त्याला जातवान असावं लागतं, तेव्हाच त्याला गोरगरीब मराठ्यांच्या वेदना कळतात. त्या नेभळ्या भोऱ्याला काय कळणार आहे? असा हल्लाबोल यावेळी जरांगे पाटील यांनी केला आहे. मुंबईहून आल्यापासून मी फडणवीस साहेबांना एक शब्दही बोललो नाही, कारण आम्हाला अशा लागली होती की फडणवीस मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करतील, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.