
Manoj Jarange patil On Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ मिळावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे उपोषण स्थगित केले. आता मनोज जरांगे पाटील यांनी लोहा गरम असेल तर हातोडा मारा, असे आवाहन मराठा समाजाला केले आहे.
“मनोज जरांगे पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे उपोषण स्थगित केले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आता ते उपचार थांबवून आंतरवली सराटीमध्ये परत जाणार आहेत. मी सुट्टी घेऊन अंतरवालीकडे निघत आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्या राज्यातील समाज एकत्र आल्यानंतर बैठकीबद्दल ठरवू. कोणाला पाडायचं याचा निर्णय उद्या 29 जुलैला घेऊ”, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
“EWS आणि SEBC सुरू ठेवा. सरकारला जे काही करायचं आहे ते स्पष्टपणे करावे. सरकारने मुलांशी जीवघेणे खेळ करु नये. सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही ही चांगली गोष्ट आहे. गर्व हा कधीही संपतो. गर्वाला कधीही वाढ नसते. सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे. मराठ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करून इकडे बोंबलत बसायचं. करायचं तर स्पष्ट करायला शिका. निकष न लावता स्पष्ट द्यायचं शिका”, असेही जरांगे पाटील म्हणाले.
शरद पवार काय सांगतात त्यापेक्षा माझे मन आणि माझी नियत काय सांगते हे महत्त्वाचे आहे. माझी प्रामाणिक भावना आहे की इतरांना ही आरक्षण मिळायला हवे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, परिणाम काहीही झाले तर चालेल. विधानसभेत यांना पाडायचे म्हणजे पाडायचे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
सरकारशी चर्चा नाही, सध्या सर्व बंद आहे. पावसामुळे नेट बंद आहे. असं म्हणत मनोज जरांगे यांनी इंटरनेटचे कारण पुढे केले. तसेच उद्यापासून बैठका घेणार असून पाडल्याशिवाय पर्याय नाही. समीकरण जुळवावे लागणार आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.