जुनी लफडी व्हायरल झाली..देशातील या शहरात 40 दिवसात 150 लग्नं मोडली… धक्कादायक अहवाल समोर
सोशल मीडियावरील जुनी लफडी लग्ने मोडण्यास कारणीभूत ठरत आहेत. इंदूरमध्ये केवळ 40 दिवसांत 150 लग्नं मोडल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. 62% लग्नं मोडण्यामागे सोशल मीडियाच जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे केवळ जोडप्यांचेच नाही, तर वेडिंग इंडस्ट्रीचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

प्रसिद्ध क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचं लग्न मधल्या काळात प्रचंड चर्चेत राहिलं. लग्नाची सर्व तयारी झालेली असताना अंतिम क्षणी हे लग्न मोडण्यात आलं. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली. स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याचं अफेयर असल्याची चर्चा होती. त्यामुळेच हे लग्न मोडल्याचं समोर आलं. ही चर्चा सुरू असतानाच एक नवीन अहवाल समोर आला आहे. देशातील अधिकाधिक लग्न मोडण्यामागे सोशल मीडिया कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. या धक्कादायक अहवालामुळे एकच खळबळ उडाली आहे.
एका हिंदी दैनिकाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात एकट्या इंदौरमध्ये 40 दिवसात 150 लग्न मोडल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे सर्व तयारी झालेली असताना आता लग्न लागणार तोच ही लग्न मोडल्याचं समोर आलं आहे. जुनी लफडी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही लग्न मोडल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. म्हणजे लग्न लागण्याच्या 15 मिनिटं आधी वधू किंवा वराचे जुने अफेयर समोर आलं. त्यामुळे वाद झाले आणि लग्न मोडल्या गेले.
सोशल मीडियाच जबाबदार
एका अहवालानुसार 62 टक्के लग्न मोडण्यास सोशल मीडिया जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. तर ऐनवेळी लग्न मोडण्यामध्ये कुटुंबातील कुणाचा तरी अपघात, वधू किंवा वराला आलेला अटॅक किंवा लग्नाच्यावेळी झालेला देवाणघेवाणीवरून वाद कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. या रिपोर्टनुसार, अनेक प्रकरणात लग्नाच्या आधी एका पार्टनरला त्याच्या आधीच्या लफड्याच्या पोस्ट सापडल्या. त्यामुळे वाद झाला, संशय वाढला आणि तणातणी होऊन लग्न मोडल्या गेली.
अफेअरमुळे खेळ खल्लास
रिपोर्टमध्ये काही धक्कादायक गोष्टीही समोर आल्या आहेत. इंदौर आणि गुजरातमध्ये प्री-वेडिंग शूटदरम्यान वधूच्या जुन्या सोशल मीडिया पोस्टवरून झालेल्या जोरदार वादामुळे लग्न तुटले. दुसऱ्या एका प्रकरणात लग्नाच्या सजावटीवर सुमारे 1 कोटी रुपये खर्च झाले होते. संगीत समारंभानंतर वधू अचानक गायब झाली. नंतर समजले की तिचे दुसऱ्या कोणासोबत अफेअर सुरू होते. याचप्रमाणे विठ्ठल-रुक्मिणी गार्डनसारख्या काही मॅरेज व्हेन्यूवर एका महिन्यात तब्बल तीन लग्ने रद्द करावी लागली. कुठे आजार कारणीभूत ठरला, कुठे कुटुंबातील वाद झाले, तर कुठे अचानक जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे लग्न रद्द करावे लागले.
फ्रेंड लिस्टवरूनही वाद
पूर्वी लग्न तुटण्यामागे हुंडा हे मोठे कारण मानले जात होते, पण आता परिस्थिती बदलली आहे. अहवालानुसार आता 60 ते 70 टक्के प्रकरणांमध्ये लग्न तुटण्याचे कारण सोशल मीडिया ठरत आहे. जुने पोस्ट, कमेंट्स, लाईक्स, इमोजी किंवा अगदी फ्रेंड लिस्टवरूनही वाद निर्माण होतात आणि शेवटी लग्न रद्द होण्यापर्यंत प्रकरण जात असल्याचं समोर आलं आहे.
आर्थिक नुकसानही होत आहे
अखेरच्या क्षणी लग्ने रद्द झाल्यामुळे सर्वाधिक नुकसान वेडिंग इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना सहन करावे लागत आहे. वेडिंग प्लॅनर्स आणि हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे की अचानक लग्न रद्द झाल्यास त्यांचा झालेला खर्चही वसूल करणे कठीण होते. या रद्द झालेल्या लग्नांमुळे वेडिंग इंडस्ट्रीला सुमारे 25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम केवळ वर-वधूपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर वेडिंग प्लॅनर्स, हॉटेल्स, केटरर्स, बँड, डेकोरेटर्स आणि इतर सेवा पुरवठादारांवरही झाला आहे, कारण या सर्वांनी आधीच अॅडव्हान्स बुकिंग घेऊन तयारी केलेली होती.
सोशल मीडियाचा नात्यावर परिणाम
सोशल मीडियाचा नातेसंबंधांवर खोलवर परिणाम होत असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे. Pew Research Center (2020) च्या अभ्यासानुसार, 45 टक्के लोकांनी मान्य केलंय की, सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये संशय आणि तणाव वाढतो. Journal of Social and Personal Relationships मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जुने पोस्ट, लाईक्स आणि कमेंट्स यामुळे पार्टनरमध्ये अविश्वास निर्माण होतो. तसेच University of Kansas च्या अभ्यासात असे दिसले की, पार्टनरच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीवर अती लक्ष ठेवणे हे लग्नापूर्वी होणाऱ्या भांडणांचे आणि ब्रेकअपचे मोठे कारण ठरले आहे.
