मराठा समाजाने तयार केली विवाह आचार संहिता, हुंडा घेणाऱ्यांशी आता….

मराठा समाजाने केलेल्या शिफारसी अंमलात आणण्यासाठी समाजातील काही जबाबदार आणि कर्तव्यदक्ष व्यक्तीची समिती अथवा मंडळ स्थापन केले जाणार आहे.

मराठा समाजाने तयार केली विवाह आचार संहिता, हुंडा घेणाऱ्यांशी आता....
| Updated on: Jun 04, 2025 | 8:43 PM

पुणे येथील मुळशी येथे वैष्णवी हगवणे हीने हुंड्यापायी जीवन संपवल्याची घटना घडल्यानंतर आता मराठा समाजाने विवाह आचारसंहिता तयार केली आहे. यापुढे मराठा समाजात हुंडा घेणाऱ्या कुटुंबाशी कोणतेही रोटी बेटी व्यवहार करणार नसल्याचे म्हटले आहे. ‘मराठा समाज जागा हो, मुलीच्या रक्षणाचा धागा हो, आपली लेक आपली लढाई’ अशी भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत श्रीकांत शिरोळे, भानुप्रताप बर्गे, श्रीमंत कोकाटे यांनी भूमिका मांडली.

पुण्यात मराठा समाजाची नुकतीच बैठक झाली. पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाज बैठक पुण्यातील सेंट्रल पार्क हॉटेल येथे या संदर्भात बैठक झाली. मराठा समाजाने विवाह सोहळ्या संदर्भातील काही प्रमुख आचारसंहिता यावेळी जाहीर केली. मराठा समजातील धुरिणांनी यावेळी हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही असा दंडक घालून दिला आहे. ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो हुंडा घेतला जातो, त्या कुटुंबाशी समाज रोटी – बेटी व्यवहार करणार नाही तसेच ते कुटुंब मराठा समाजातून बहिष्कृत केले जाईल असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य

ज्या महिलेचा सासरच्यांकडून छळ होत असेल, त्यावेळी तिचे माहेरचे लोक ठामपणे तिच्यापाठीशी उभे राहतील. कोणत्याही प्रकारचे ओंगळवाणे प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने आणि वेळेवर केली जातील. तसेच मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केले जाणार नाही, जावई मान आदी सर्व मान कौटुंबिक स्वरूपात केले जातील. यापुढे मराठा समाज सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल असेही यावेळी ठरविण्यात आले.

विवाह सोहळ्यात एकच व्यक्ती आशीर्वादाच्या स्वरूपातील भाषण देईल. विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांमध्ये पार पडेल. विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून मुलगी आणि मुलाच्या नावे एफडी केली जाईल, तसेच काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरूपात दिली जाईल असेही यावेळी ठरवले गेले.

विवाह सोहळ्याचा खर्च ५०-५०, प्री-वेडिंग शूट टाळणार

वरातीमधील कर्ण कर्कश्य डीजेचा आवाज आणि त्यावरील विभत्स नृत्यं बंद केली जातील, तसेच प्रदूषणयुक्त फटाके वाजवले जाणार नाहीत. यापुढे आता कोणत्याही विवाहाचे प्री-वेडिंग शूट टाळले जाईल. विवाह सोहळ्याचा खर्च वर आणि वधू पक्षाने अर्धा – अर्धा करावा असे ठरविण्यात आले आहे.

काही महत्त्वाच्या सूचना आणि नियमावली

१ – विवाह ठरविताना दोन्ही कुटुंबीयांच्या पार्श्वभूमी बाबत सखोल माहिती घ्यावी

२ – तरुण-तरुणी यांची बैठक घेऊन चर्चेद्वारे त्यांच्याकरिता एक आचारसंहिता ठरवली जाईल

३ – महिलांकरिता एक बैठक घेऊन चर्चेद्वारे एक आचारसंहिता ठरवली जाईल

४ – प्रतिष्ठेच्या संकल्पना बदलाव्या लागतील त्यासाठी मराठा समाज प्रयत्न करेल

५ – पिढ्यानपिढ्यांची मानसिकता बदलण्यास काही कालावधी जाईल याकरिता आवश्यक जन जागृती सातत्याने मराठा समाज प्रयत्न करेल

६ – आदर्श विवाह घडवून आणणाऱ्या कुटुंबाचा समाजाने गौरव करावा, तसेच समाजातील आदर्श विवाह सोहळ्याचे अनुकरण करण्यात येईल

७ – मुला आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे

८ – येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज इतर सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व नियमावली आणि आचारसंहिता याबाबत चर्चा करून संपूर्ण समाजासाठी त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रयत्न करेल

९ – यावरील सर्व बाबी अंमलात आणण्यासाठी समाजातील काही जबाबदार आणि कर्तव्यदक्ष व्यक्तीची समिती अथवा मंडळ स्थापन केले जाईल. यामध्ये सहभागी कोणतीही व्यक्ती वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय व्यावसायिक सामाजिक इत्यादी गैरफायदा येणाऱ्या मानसिकतेची नसावी याची पूर्ण खात्री केली जाईल

१० – वरीलप्रमाणे गावागावात समिती नेमून काही अनुचित प्रकार होत असल्यास मध्यस्थी करून त्यांना रोखावे