सरकारपुढे नवं टेन्शन, आता मातंग समाज आझाद मैदानात एकवटणार, उपवर्गीकरणासाठी थेट अल्टिमेटम!

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावर चर्चा करण्यासाठी नांदेडमध्ये मातंग समाजाचे नेते जमा झाले होते. 29 सप्टेंबरपर्यंत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मार्ग नाही निघाला नाही तर राज्यभरातील मातंग समाजाला घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करू असा इशारा सकल मातंग समाजाने यावेळी दिला.

सरकारपुढे नवं टेन्शन, आता मातंग समाज आझाद मैदानात एकवटणार, उपवर्गीकरणासाठी थेट अल्टिमेटम!
matang protest
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 13, 2026 | 9:57 PM

Reservation Protest : गेल्या अनेक दिवसांपासून अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्यभर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे, अशी मागणी मातंग समाजाकडून केली जात आहे. याच मागणीला घेऊन राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे काढले जात आहेत. दुसरीकडे मनोज जरांगेदेखील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांनी थेट मुंबईत येऊन आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. त्या दृष्टीने नियोजन चालू झाले आहे. जरांगे यांच्या घोषणेमुळे सरकारपुढे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. असे असतानाच आता सकल मातंग समाजाने सरकारला मोठा इशारा दिला आहे. येत्या 29 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय न घेतल्यास आम्ही थेट मुंबईतील आझाद मैदानात येऊन आंदोलनाला बसू असा थेट इशार देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारपुढे आणखी मोठा पेच निर्माण झाला आहे.

पुढील काळात विस्फोट होण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावर चर्चा करण्यासाठी नांदेडमध्ये मातंग समाजाचे नेते जमा झाले होते. 29 सप्टेंबरपर्यंत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा मार्ग नाही निघाला नाही तर राज्यभरातील मातंग समाजाला घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करू असा इशारा सकल मातंग समाजाने यावेळी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावाच लागेल. आता समाज शांत आहे पण पुढील काळात विस्फोट होण्याची शक्यता आहे, असे मत भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी दिली. देशातल्या 6 राज्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्यात आले आहे. आमची मागणी आहे की, महाराष्ट्रातसुद्धा आरक्षण उपवर्गीकरण झाले पाहिजे, अशी भूमिका भाजपा आमदार जितेश अंतापुरकर यांनी घेतली आहे.

अन्य जातींचा उपवर्गीकरणाला विरोध

त्यामुळे आता सरकार मातंग समाजाच्या या मागणीकडे कसे पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील इतर जातींनी मात्र उपवर्गीकरणाला थेट विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही उपवर्गीकरणाला विरोध केला आहे. उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याचे कृत्य आहे, अशी भूमिका काही लोकांकडून घेतली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us