MLC Election Result 2026 : तुमच्या दोन नेत्यांनी… भाजपचा बुरखा टराटरा फाडला, शिंदे सेना आक्रमक; डायरेक्ट…
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत मोठा भडका उडाला आहे. शिंदे सेनेने भाजपवर 'युती धर्म' न पाळल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत भाजपच्या नेत्यांनी मित्रपक्षाविरोधात प्रचार केल्याचा शिंदे सेनेने दावा केला आहे. भाजपने आत्मचिंतन करावे आणि मित्रपक्षांना योग्य मान द्यावा, अशी मागणी शिंदे सेनेने केली, ज्यामुळे दोन्ही पक्षांतील संघर्ष तीव्र झाला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाल्याने शिंदे सेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महायुतीत भडका उडाला आहे. भाजपने तर थेट शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे सेनेनेही भाजपचा बुरखा टराटरा फाडला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत तुमच्या नेत्यांनी कुणाचा प्रचारा केला? युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? असा सवाल शिंदे सेनेने भाजपला केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच भडका उडाला आहे.
शिंदे सेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. विधान परिषद निवडणुकीत महायुतीत समन्वय असता तर पाचही जागा निवडून आल्या असत्या. भाजप मुख्य भूमिकेत होता. पुण्यातील एक जागा शिवसेनेला मिळावी, अशी आमची इच्छा होती. भाजपने तीनही उमेदवार जाहीर केले. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केला होता. तो मागे घेतला. सचिन सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. एक जागा आम्हाला द्यावी ही आमची पहिल्यापासून मागणी होती, असं आनंद परांजपे म्हणाले.
बंब यांनी कुणाचा प्रचार केला?
अब्दुल सत्तार यांनी विरोधात काम केले, असा नवनाथ बन यांनी आरोप केला आहे. सत्तार यांनी विरोधात भूमिका घेतली तर मग आमदार प्रशांत बंब यांनी कोणाचा प्रचार केला? भाजपच्या आमदारांनी कोणाचा प्रचार केला याचा तपास करावा. अमरावतीमध्ये शिवसेनेच्या विरुद्ध तीन बंडखोर उमेदवार होते. अनिल बोंडे यांच्या भगिनी लढत होत्या, याकडेही परांजपे यांनी लक्ष वेधले.
हेकेखोरपणा सोडा
भाजप जगभरातील मोठा पक्ष आहे. देशातील मोठा पक्ष आहे. राज्यातील मोठा पक्ष आहे. तरीही त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा चिमटा काढतानाच पुण्यातील दोन्ही जागा भाजपच्या सीटिंग नव्हत्या. भाजपने प्रत्येक निवडणुकीत सगळ्या जागा आम्हीच लढवणार या गोष्टीला मुरड घातली पाहिजे, असा सल्लाही परांजपे यांनी दिला.
आंदोलनाचा परिणाम झाला का?
अमरावतीमध्ये तीन बंडखोर उमेदवार होते. बन यांनी शोधपत्रकरिता करावी. अमरावतीत काय घडलं ते पाहावं, असं सांगतानाच भाजपने मित्र पक्षाला योग्य सन्मान द्यावा. मोठ्या भावाने योग्य सन्मान दिला तर बरं होईल, असंही त्यांनी म्हटलंय. विद्यार्थ्यांची जी आंदोलने झाली त्याचा या निवडणुकीत परिणाम झाला का? याचाही विचार करायला हवा. समन्वय चांगला असता तर निकाल 5-0 लागला असता, असंही ते म्हणाले.
