BJP vs Shivsena : नवनाथ बन यांना माझी विनंती आहे की, त्यांनी..शिंदे शिवसेनेचा भाजपवर पलटवार
BJP vs Shivsena : "या निवडणुकीत शिवसेनेने सानप यांना पाठिंबा देऊन पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढलो. पहिल्यादिवसापासून पक्ष म्हणून आमची आग्रही भूमिका होती की, एक जागा आम्हाला लढायला दिली पाहिजे म्हणून" असं आनंद परांजपे यांनी सांगितलं.

विधान परिषद निवडणुकीच्या पाच जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत असंतोषचा स्फोट झाला आहे. विसंवाद समोर आला आहे. एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पाच जागांपैकी तीन जागा महायुतीने गमावल्या. भाजपने याचे खापर एकनाथ शिंदे शिवसेनेवर फोडलं. शिंदे सेनेने सहकार्य केलं नाही, अन्यथा पाचही जागा निवडून आल्या असत्या असं भाजपचं म्हणणं आहे. या आरोपाला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
“महयुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय असता तर पाचही जागा निवडून आल्या असत्या. भाजपची या मध्ये प्रमुख भूमिका होती. पहिल्यादिवसापासून शिवसेनेच्या पुण्यातल्या दोन जागांपैकी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षकपैकी एक जागा शिवसेनेला लढायला द्यावी अशी आग्रही भूमिका पहिल्या दिवसापासून शिवसेनेची होती” असं शिवसेना नेते आनंद परांजपे म्हणाले. “ज्यावेळी समन्वयाची बैठक झाली, त्यावेळी चार जागांवर निर्णय झाले. पण दुर्देवाने भाजपने त्यांचे तिन्ही उमेदवार पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर हे तिन्ही उमेदवार जाहीर केले. शिवसेनेने मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज भरलेला. तो मागे देखील घेतला. या निवडणुकीत शिवसेनेने सानप यांना पाठिंबा देऊन पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढलो. पहिल्यादिवसापासून पक्ष म्हणून आमची आग्रही भूमिका होती की, एक जागा आम्हाला लढायला दिली पाहिजे म्हणून” असं आनंद परांजपे यांनी सांगितलं.
भाजपने मराठवाड्यात कोणाचा प्रचार केला?
“मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ती जागा लढवली. त्या उमेदवाराचे तीन टर्म झाले होते. त्या उमेदवाराबद्दल एक प्रस्थापित विरोधी लाट होती. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधात काम केलं असा आरोप नवनाथ बन यांनी केला. माझी त्यांना विनंती आहे की, भाजप आमदार प्रशांत बंब यांनी कोणाचा प्रचार केला किंवा भाजपने मराठवाड्यात कोणाचा प्रचार केला, याचा शोध घेतला पाहिजे” असं शिवसेनेने म्हटलं आहे. “राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. ती ही प्रशांत बंब यांच्याविरुद्ध. भाजपच्या आमदारांनी नेमकं कोणाचं काम केलं, याचा शोध भाजपने घेतला पाहिजे” असं आनंद परांजपे म्हणाले.
