
Asaduddin Owaisi : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. एवढंच नव्हे तर या हल्ल्याचा जशास तसा बदला घ्यावा, अशी मागणीही केली जात आहे. दरम्यान, एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील समस्त मुस्लीम बांधवांना मोठे आवाहन केले आहे. त्यांनी शुक्रवारचे नमाज पठण करताना सर्वांनी या हल्ल्याचा निषेध करावा, असे त्यांनी मुस्लीम बांधवांना आवाहन केले आहे.
असदुद्दीन ओवैसी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पलहगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. तसेच आम्ही इस्लामचा सहारा घेऊन कुणालाही खून करण्याची परवानगी देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी समस्त मुस्लिमांना आवाहान केले आहे. “मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की उद्या नमाज पठण करताना आपल्या दंडाला काळी पट्टी बांधून जावे. या माध्यमातून आपण दहशतवाद्यांना एक संदेश देऊया. आम्ही तुमच्या या हीन कृत्याचा निषेध करतो, असे आपण त्यांना या माध्यमातून सांगुया,” असा संदेश त्यांनी समस्त मुस्लीम बांधवांना दिला आहे.
तसेच, इस्लामचा संदर्भ देऊन तुम्हाला खून करण्याची आम्ही कधीही परवानगी देणार नाही, असं आपण या माध्यमातून दहशतवाद्यांना सांगुया, असा निर्धारही त्यांनी या व्हिडीओत व्यक्त केला आहे.
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमने या हल्ल्याचा निषेध केला. संभाजीनगरातील क्रांती चौकात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत पाकिस्तानचा झेंडा फाडून या हल्ल्याबाबत आपला रोष व्यक्त केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. भारताने आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी यावेळी एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.