मध्य रेल्वेप्रकरणी केंद्रीय मंत्री दानवेंना भुजबळांचे साकडे; पत्रातून काय केली मागणी?

| Updated on: Feb 13, 2022 | 11:15 AM

मंत्री छगन भुजबळांनी पत्रात म्हटले आहे की, अंडर पास तयार करताना रेल्वेच्या तांत्रिक विभागाने त्याची व्यवहार्यता न पाहता अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांचे बांधकाम केले आहे. या भुयारी मार्गातून पाणी जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात या मार्गामध्ये तुडुंब पाणी भरलेले असते.

मध्य रेल्वेप्रकरणी केंद्रीय मंत्री दानवेंना भुजबळांचे साकडे; पत्रातून काय केली मागणी?
रावसाहेब दानवे, छगन भुजबळ.
Follow us on

नाशिकः मध्य रेल्वेच्या (Central Railway) मनमाड दौंड व मनमाड – हैदराबाद रेल्वे मार्गावरील भुयारी रस्त्यातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे केली. याबाबत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. थोडासाही पाऊस झाला की या अंडरपासमध्ये पाणी साचते. त्यामुळे हा भुयारी मार्ग वारंवार बंद करावा लागतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी अडचण होते. या भागातील दळणवळण बंद होते. हे पाहता नागरिकांनी वारंवार ही मागणी लावून धरली आहे. आता याप्रकरणी पालकमंत्री भुजबळांनी थेट केंद्रीय मंत्री दानवे यांना साकडे घातले आहे.

काय आहे पत्र?

मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, माझ्या येवला मतदारसंघातील मनमाड-दौंड रेल्वे मार्गावर पिंपळगाव जलाल व धामोडे येथे, तर मनमाड-नांदेड-हैदराबाद मार्गावर नगरसोल येथे रेल्वे फाटक होते. सदर रेल्वे फाटके काढून रेल्वेने या ठिकाणी अंडर पास मार्ग तयार केले आहेत. मात्र, हे अंडर पास तयार करताना रेल्वेच्या तांत्रिक विभागाने त्याची व्यवहार्यता न पाहता अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांचे बांधकाम केले आहे. या भुयारी मार्गातून पाणी जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात या मार्गामध्ये तुडुंब पाणी भरलेले असते.

4 ते 5 महिने मार्ग बंद

मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, भुयारी मार्गात पाणी तुंबते. त्यामुळे पावसाळ्यातील 4 ते 5 महिने हे भुयारी मार्ग बंद होतात. नागरिकांचे दळणवळण बंद होते. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होऊन त्यांना लांबच्या पर्यायी रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील दळणवळण सुरळीत होण्यासाठी या भुयारी मार्गातून पाण्याचा निचरा करण्याची कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणी नुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!