
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. सध्या त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. धनंजय मुंडेंना झालेला हा आजार नेमका काय? तो कशामुळे होतो? त्याची लक्षण काय? याबद्दलची माहिती समोर आली आहे.
बेल्स पाल्सी म्हणजे काय? (What is Bell’s Palsy)
बेल्स पाल्सी हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात. त्याच्या चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो. चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा किंवा अंशत: पक्षाघात होतो. यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते. यामुळे तुम्हाला पापणी नीट बंद करता येत नाही. तसेच तुम्हाला एक डोळा बंद करण्यात अडचणी येऊ शकतात. हसण्यासही त्रास होऊ शकतो. बेल्स पाल्सी हा फक्त प्रौढ व्यक्तींना किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना होतो. योग्य औषधोपचार केल्यास २ ते ३ महिन्यानंतर आजाराची लक्षणे नाहीशी होतात.
बेल्स पाल्सी हा आजार जास्त तणाव किंवा मानसिक दडपणामुळे होऊ शकतो. अचानक थंडी लागणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, या व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो. मधुमेह (डायबिटीज) किंवा इतर काही आरोग्य समस्या असलेल्यांनाही हा आजार होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे जेवणात मीठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळेही हा आजार उद्भवू शकतो. मिठाचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. स्ट्रोक हे चेहऱ्यावर येणाऱ्या पक्षाघाताचे मुख्य कारण आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)